Murbad first girl metro loco pilot: ठाणे – मुरबाड तालुक्यातील आसोळे या लहानश्या गावातून मोठे स्वप्न उराशी बाळगून प्रगती कोर हिने मेट्रोच्या पायलट सीटपर्यंतचा पल्ला गाठला आहे. गावातून शिक्षण घेत, संघर्षाला सामोरे जाऊन प्रगती हिने पुणे मेट्रोमध्ये लोको पायलट या पदावर कार्यरत आहे. तसेच ती पुण्यातील १०० हून अधिक मुलींना प्रशिक्षण देखिल देत आहे.

प्रगती कोर (२७) ही मुरबाड तालुक्यातील आसोळे या गावात राहते. ५ सप्टेंबर २०२२ रोजी वयाच्या २५ व्या वर्षी ती अधिकृतरित्या मुंबई मेट्रोमध्ये लोको पायलट म्हणून रुजू झाली. सुरूवातीला कठोर परिश्रम, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर लेखी परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण केली. आज ती पुणे येथे हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळते. तसेच शंभरहून अधिक मुलींना मेट्रोचे प्रशिक्षण देत आहे. सुरूवातीला घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावर ती मेट्रो चालवत होती.

लोकसत्ताशी बोलताना तिने सांगितले, “आमच्या कुटुंबात कोणीही या क्षेत्रात नाही. पण मी जेव्हा मेट्रो चालवते, तेव्हा मला स्वतःचा अभिमान वाटतो. आई-वडिलांना जेव्हा पहिल्यांदा समजले की त्यांची मुलगी मेट्रो चालवते, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आज ते अभिमानाने सर्वांना ‘ती आमची मुलगी आहे’ असे सांगतात. ती पुणे येथे वरिष्ठ पायलट असून प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळते. प्रेरणाने तरुणींना संदेश देताना, स्वतःवर विश्वास ठेवा. आपण कुणापेक्षा कमी नाही. आयुष्य सोपे नसेल, पण जिद्दीने चालत राहिलात, तर आकाशही आपलेच असते असे मार्गदर्शन केले.

संघर्षमय वाटचाल

पहिल्यांदा मेट्रो चालवताना मनात काहीशी भिती वाटत होती. आपल्याला हे “जमेल का?” हा प्रश्न सतत भेडसावत होता. त्यात मुंबईसारख्या ठिकाणी गर्दी असते आणि तिथे मेट्रो चालवायची जबाबदारी होती असे ती म्हणाली.

आर्थिक अडचणींवर मात

शिक्षण सुरू असताना मोठी बहीणही शिकत होती, त्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. शहरात राहण्याची सोय, अभ्यास आणि काम यांचा समतोल राखत स्वप्न पुर्ण केले. त्यामुळे आजचा दिवस गाठता आला, असे प्रेरणाने सांगितले.

शिक्षण

मुरबाडमधील स्थानिक शाळेत शिक्षण घेत दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यानंतर मुंबईतील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथून डिप्लोमा आणि खारघरमधील ए. सी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. गावातून एकटीने शहरात येणे, अपरिचित वातावरणात स्वतःचे स्थान निर्माण करणे हा तिच्यासाठी आव्हानात्मक प्रवास ठरला. शिक्षणानंतर प्रेरणाने प्रगती इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड मध्ये डिझाईन इंजिनिअर म्हणून काही काळ काम केले होते.