ठाणे : अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराला कंटाळून भिवंडी येथील यंत्रमाग कामगाराने मालकाचीच दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. काजुकुमार रजेंदर राम (२१) असे आरोपीचे नाव असून गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला उत्तरप्रदेशातून अटक केली आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

भिवंडी येथील बाह्यवळण परिसरातील एका गृहसंकुलात यंत्रमाग मालक पत्नी आणि मुलींसोबत राहत होते. १२ एप्रिलला ते कामानिमित्ताने घरातून बाहेर पडले. परंतु ते घरी परतले नाही. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा तसेच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा शोध लागत नव्हता. त्यांच्या कुटुंबियांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती. १५ एप्रिलला सर्व कुटुबियांनी त्यांच्या वाहनाच्या जीपीएस प्रणालीच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना कारीवली हे स्थळ दर्शविले जात होते. त्यानंतर कटुंबियांनी तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह कारीवली येथील खाडी जवळ आढळून आला.

मृतदेह सडलेल्या अवस्थेत होते. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होता. तर याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटकडून सुरु होता. भिवंडी युनीटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, उपनिरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, राजेश गावडे, निलेश बोरसे, सुनील साळुंखे, रंगनात पाटी, साबीर शेख, सचिन जाधव, सुदेश घाग, माया डोंगरे, रविंद्र साळुंखे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरु केला. त्यावेळी आरोपी हा उत्तरप्रदेश येथील हिरापुर या त्याच्या मूळगावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला शनिवारी अटक केली.

म्हणून हत्या…

काजुकुमार हा लुम मालकाकडे तीन वर्षांपासून काम करत होता. तो वारंवार त्याच्याकडे अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराची मागणी करत असे. या त्रासाला काजुकुमार कंटाळला होता. १२ एप्रिलला काजुकुमारने त्याला भेटण्यास बोलावले. दोघेही दुचाकीने कारीवली भागात आले. त्यावेळी काजुकुमार याने दगडाने ठेचून मालकाची हत्या केली.