ठाणे : भिवंडी येथील न्यू आझादनगर भागात किरकोळ वादातून दोन कुटुंबामध्ये झालेला वाद एका तरुणाच्या बेतला. त्याच्या आईसमोर, घराजवळ बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, हत्या करणारा तरुणाचा मित्र असून दोघेही एकाच कंपनीमध्ये कामाला आहे. हसन शेख, त्याचे भाऊ मकबुल शेख, हुसैन शेख, त्याची बहीण आसमा वाजीद आणि त्याची आई सुलताना शेख अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
जिशान अन्सारी (२५) असे मृत मुलाचे नाव आहे. तो त्याची २० वर्षीय पत्नी सिमरन त्यांचा दीड वर्षांचा मुलगा, बहीण शबाना, तिचा पती इरशाद आणि आई फरजना यांच्यासोबत वास्तव्यास आहे. जिशान हा वडपे येथील एका कंपनीत कामाला असून तो हसन शेख आणि इमरान शेख यांच्यासोबत एकाच दुचाकीवरुन कामाला जात असे. ४ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता हसन शेख हा परिसरातील नागरिकांना अचानक शिवीगाळ करु लागला होता. हा प्रकार इरशाद यांनी पाहिला असता, त्यांनी तात्काळ याची माहिती शबाना हिला दिली. त्यानंतर फरजना, शबाना आणि जिशान याची एक बहिण तेथे गेले. त्यांनी हसन याला याचे वाद मिटविला. परंतु तासाभराने हसन याच्या आईने फरजना यांना संपर्क साधला. तसेच त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर हसन यानेही त्यांना शिवीगाळ केली. इरशाद यांना मारहाण करणार असल्याची धमकी देखील हसन याने त्यांना दिली.
आणि आईसमोरच प्राण सोडला..
– फरजना या कुटुंबासोबत घरी असताना अर्ध्या तासाने हसन हा त्याचे दोन भाऊ, आई आणि बहिणीला घेऊन जिशान याच्या घराच्या दिशेने गेला. त्यावेळी जिशान हे घरी नव्हते. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने हसन याने इरशाद यांना बाहेर उभे राहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इरशाद घरामध्ये नसल्याचे जिशान याच्या बहिणीने सांगितल्यानंतर त्याने तिच्या पोटावर लाथ मारली. इतरजण त्यांचा वाद सोडविण्यासाठी गेले असता, हसन आणि त्याच्या कुटुंबियांनी इतरांना देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जिशान हा दुचाकीने घरी पोहचला होता. तो दुचाकीवरुन उतरत असताना, त्याला हसन याने लाथ मारुन खाली पाडले. त्यानंतर हसन याच्यासह इतरांनी त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. परिसरातील नागरिकांनी हा वाद सोडविला. जिशान हा बेशुद्ध अवस्थेत दाराजवळ पडला होता. त्याला तात्काळ नागरिकांनी भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी त्याला तपासून दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी हसन याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे.