डोंबिवली – नाशिक येथील एका महिला डाॅक्टरला व्यवसायासाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवून डोंबिवलीतील एका खासगी सावकाराने कर्ज प्रक्रियांसाठी १२ लाख रुपये डाॅक्टर महिलेकडून उकळले. त्यानंतर कर्ज प्रक्रिया पार न पाडता महिला डाॅक्टरला पाच लाख ८० हजार रुपये परत करून उर्वरित सहा लाख २० हजार रुपये परत न करता महिला डाॅक्टरची खासगी सावकाराने आर्थिक फसवणूक केली आहे.

या फसवणूक प्रकरणी महिला डाॅक्टरने डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. याप्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

तक्रारदार महिला डाॅक्टर या नाशिक येथील तिडके वसाहत भागात राहतात. खासगी सावकार हा डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर भागात राहतो. पोलीस ठाण्यात महिला डाॅक्टरने प्राथमिक माहिती अहवालात दिलेली माहिती, अशी की गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहा दिवसाच्या कालावधीत गणेशनगरमध्ये राहणाऱ्या खासगी सावकाराने नाशिक येथील महिला डाॅक्टरला त्यांच्या डोंंबिवलीतील घरी व्यवसाय करण्यासाठी कर्ज देण्याचे आश्वासन दिले. वित्तीय संस्थांकडे न जाता झटपट कर्ज मिळते म्हणून या महिला डाॅक्टरने खासगी सावकाराकडून कर्ज घेण्याची तयारी दर्शवली.या कर्ज प्रक्रियेतील मुद्रांक शुल्क, कर्ज प्रक्रिया शुल्क, व्याज बयाणा रक्कम अशी एकूण १२ लाख रुपयांची रक्कम खासगी सावकाराने महिला डाॅक्टरकडून वसूल केली. कर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक रक्कम भरणा केल्यानंतर महिला डाॅक्टरने खासगी सावकाराकडे कर्ज देण्याची मागणी सुरू केली. त्यावेळी खासगी सावकाराने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आपणास कर्ज देणार नसाल तर आपले कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेले १२ लाख रुपये परत करा, असा तगादा महिला डाॅक्टरने लावला. या सततच्या पाठपुराव्यानंतर खासगी सावकाराने महिला डाॅक्टरला पाच लाख ८० हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम नंतर देण्याचे आश्वासन दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्ष उलटले तरी खासगी सावकाराने महिला डाॅक्टरचे उर्वरित सहा लाख २० हजार रुपये परत केले नाहीत. ही रक्कम परत न करून खासगी सावकाराने आपली फसवणूक केली म्हणून महिला डाॅक्टरने विष्णुनगर पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिनकर याप्रकरणाचा तपास करत आहेत.