लालभडक निखाऱ्यांवर भाजले जाणारे मक्याचे कणीस. त्याच्या टपोऱ्या दाण्यांवर लिंबू-तिखट मिठाचा होणारा शिडकावा.. आहाहा.. कुणाच्याही तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे. पावसाच्या सरी अंगावर झेलत, चिंब भिजल्यानंतर पोटात कावळे ओरडायला लागतात. अशा वेळी गार वाऱ्याच्या झुळकेसोबत चटपटीत खाण्याची खवय्यांना इच्छा होते आणि त्यांची पावले भुट्टा मिळणाऱ्या हातगाडय़ांकडे वळतात. कधी त्यावर मीठ आणि लिंबू लावलेले तर कधी बटर आणि चटणी लावून. या भुट्टय़ातही गावठी भुट्टा तुम्हाला मिळाला तर सोन्याहून पिवळे. आधुनिक हायब्रीडच्या युगात गावठी मक्याचे कणीस मिळणे सध्या दुरापास्त झाले आहे.
समुद्रकिनारा, धबधब्याचे ठिकाण अशा ठिकाणी हमखास दिसणारा भुट्टा आता शहरातील बाजारपेठा, रस्ते, गल्ल्या, शाळा- महाविद्यालयांच्या हातगाडीवरही हायब्रीड भुट्टेच मिळतात. झोंबणाऱ्या वाऱ्यात, मुसळधार पावसात गरमागरम मस्त मक्याचा आस्वाद घेण्याचा आनंद काही औरच असतो. मग ते कणीस गावठी असो वा हायब्रीड. तिखट, आंबट, चुरचुरीत चवीच्या मक्याचा मोह खवय्यांना भुरळ घालतो. काही नागरिक तर घरी हे भुट्टे घेऊन जाऊन मित्रांसोबत जंगी पार्टीचे आयोजन करतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत मक्याच्या कणसांना जास्त मागणी असते. महागाईच्या जमान्यात हे भुट्टेही भाव खाऊन गेले असून विक्रेत्यांना घाऊक बाजारात ३०० ते ४०० रुपयांपर्यंत एक गोण मिळते. किरकोळ बाजारात १० ते १५ रुपयांना  भुट्टे विकले जातात. आता बाजारातही गावठी कणीस सहसा दिसणार नाही. हायब्रीड कणिसाचे पीक लवकर मिळते. शिवाय ते वजनदार असल्याने शेतकरी त्याची लागवड जास्त प्रमाणात करतात. त्यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळते.
मस्त पाऊस कोसळतोय, गार वारा सुटला आहे. छत्र्या उलटसुलट होताहेत. अशा गारेगार कुंद वातावरणात पावसात यथेच्छ भिजत मित्रांसोबत गरमागरम भुट्टा खाण्याची मज्जा काही औरच असल्याचे स्नेहा वाघ हिने सांगितले.

बदलत्या जीवनशैलीनुसार मक्याचे स्वरूपही बदलत चालले आहे. हल्ली मका म्हणजे केवळ आपला भुट्टा राहिला नसून तो पॉपकॉर्न, मका पॅटिस, उकडलेले अमेरिकन कॉर्न, स्वीट कॉर्न सुप, मका भजी अशा नानाविध रूपात भेटायला लागला आहे. १० ते १५ रुपयांना मिळणारा भुट्टा मल्टीप्लेक्समध्ये मसाला कॉर्न झाल्यावर त्याची किंमत ५० ते ६० रुपयांवर जाते. उकडून, बटर लावून, मसाला लावून एका कागदी कपामध्ये दिलेले हे मक्याचे दाणे खायला मजा येते.