ठाणे : संकेतस्थळ तयार करुन त्याआधारे, ऑनलाईन वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पश्चिम बंगालमध्ये जाऊन अटक केली. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात पाच पिडीत मुलींची सुटका केली आहे. तर आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
राजेशकुमार यादव, दिशेन डांगी, मुकेश राय, शंभू उपाध्याय, मकबूल अन्सारी आणि धिरेंद्र आर्य अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील राजेशकुमार हा संकेतस्थळ चालवित होता. तर, मुकेशकुमार हा रिक्षा चालक असून तो मुलींना ग्राहकांपर्यंत पोहचवित असायचा. तर उर्वरित सर्व दलाल म्हणून काम करत होते.
अनैतिक व्यापार, अवैध व्यवसायांवर करावाई करण्याचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले होते. त्यानुसार, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने ८ जुलैला रात्री ११ वाजता बनावट ग्राहकांच्या मदतीने तुर्भे येथील एका हाॅटेलमध्ये सापळा रचला होता. या सापळ्यात पोलिसांनी पाच पिडीत मुलींची सुटका केली. तर कारवाई दरम्यान राजेशकुमार यादव, दिनेश डांगी आणि मुकेश राय या तिघांविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना अटक केली. तर त्यांच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेत होता.
दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपी हे पश्चिम बंगालमधील मालदा भागात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने २२ जुलैला पश्चिम बंगालमध्ये जाऊन तेथून शंभू, मकबुल आणि धिरेंद्र या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना तुर्भे पोलीस ठाण्यात हजर करुन अटक करण्यात आली. या कारवाईत साहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपालबनसोडे, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस हवालदार मांडोळे, पोलीस शिपाई पारसुर यांनी सहभाग घेतला होता.
अशी झाली कारवाई
पोलिसांना एक व्हॉट्सॲप क्रमांक प्राप्त झाला होता. हा क्रमांक तीन संकेतस्थळाशी संलग्न होता. त्या संकेतस्थळांवर प्रवेश केल्यानंतर ग्राहकाला नवी मुंबईतील वाशी, नेरूळमधील लॉज नोंदणी करायला सांगितले जाते. वेश्या व्यवसाय करणाऱ्या पिडीत मुलीला ग्राहकाने होकार दर्शविल्यानंतर चार ते पाच तासांचे चार हजार रुपये ग्राहकाकडून घेतले जात होते. गेल्याकाही महिन्यांपासून ऑनलाईनरित्या हा वेश्या व्यवसाय सुरु होता.