Navi Mumbai International Airport DGCA License: नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (एनएमआयए) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून एरोड्रोम परवाना मंजूर झाला आहे. हा परवाना विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा आणि नियामक अटी पूर्ण केल्यानंतर हा परवाना देण्यात आला आहे.

नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले असून विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा आणि नियामक निकषांचे पालन केल्यानंतर एरोड्रोम परवाना विमानतळाला मंजूर झाला. या परवान्यामुळे विमानतळावर विमान उड्डाणे करणे शक्य होणार आहे. एरोड्रोम परवाना मिळाल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय दळणवळण सुधारण्याच्या ध्येयाजवळ पोहोचला आहे, असे एनएमआयएने म्हटले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यापासून व्यावसायिक उड्डाणे सुरू केली जातील असे एअर इंडिया समूहाने नुकतेच जाहीर केले होते, या विमानतळाचे संचालन अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडकडून केले जाणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात, एअर इंडिया समूहाची एअर इंडिया एक्सप्रेस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे करणार असून देशातील १५ शहरांशी जोडले जाणार आहे. तर व्यावसायिक उड्डाणे सुरु करणारी पहिली विमान कंपनी इंडिगो ठरली आहे.