Manoj Jarange Patil Mumbai Protest ठाणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ठाणे, मुंबई तसेच नवी मुंबई शहरात मोठ्यासंख्येने मराठा बांधव दाखल झाले आहेत. नवी मुंबईत दाखल झालेल्या मराठा बांधवांची वाशी येथील सिडको एग्जिबिशन सेंटर मध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. परंतू, याठिकाणी पाण्याची तसेच विद्यूत व्यवस्था नव्हती. तसेच स्वच्छतागृह देखील बंद होते. या गैरव्यवस्थेबाबत मराठा आंदोलकांनी टाहो फोडला. या टाहोनंतर नवी मुंबई महापालिकेने पुढे सरसावत अखेर या सुविधा आंदोलकांसाठी सज्ज केल्या आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. नवीमुंबईत देखील काही मराठा आंदोलक दाखल झाले आहेत. नवीमुंबई महापालिका आणि सिडकोच्या मार्फत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतू, ज्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे, त्याठिकाणी पाण्याची सुविधाच नाही, जेवणाची व्यवस्था नाही, स्वच्छता गृहांची व्यवस्था नाही यामुळे आंदोलकांचे हाल होत आहेत. श्रीमंत महापालिका पाणी का देत नाही असा टाहो आंदोलकांनी फोडला होता. तसेच या सुविधा आम्हाला दिल्या नाही तर, त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशाराही दिला. त्यांच्या या टाहोनंतर अखेर नवीमुंबई महापालिकेला जाग आली असून त्यांनी या आंदोलकांसाठी सुविधा सज्ज केल्या आहेत. या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक सिडको एक्झिबिशन सेंटर आणि एपीएमसी मार्केट परिसरात थांबलेले आहेत. त्यांच्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, वैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत.

नवीमुंबई महापालिकेमार्फत असे नियोजन

सिडको एक्झिबिशन सेंटरमधील सुविधा

१) एकूण १० पिण्याच्या पाण्याचे टँकर ठेवण्यात आले आहेत. तसेच आणखी ५ अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

२) अंघोळीकरिता एक्झिबिशन सेंटर मधील आतल्या आवारात ५० नळ आणि बाहेरील महाराष्ट्र सदनच्या भूखंडाजवळ ७० नळ अशाप्रकारे एकूण १५० नळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मधील सुविधा

कांदा बटाटा मार्केट येथे १०,००० लिटर क्षमतेचे एकूण ४ टॅंकर पुरवण्यात आलेले आहेत. तसेच अजून ५ अतिरिक्त टॅंकर पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

स्वच्छतागृहांची व्यवस्था

१) सिडको एक्झिबिशन सेंटर येथे एकूण २५० स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या स्वच्छतागृहात साफसफाई करीता एकूण ३० लोकांची टीम आणि महापालिकेचे इंजीनियर राउंड ए क्लॉक ड्यूटीवर तैनात करण्यात आले आहेत.

२) स्वच्छता सफाईकरिता एकूण ५ सक्शन मशीन तैनात करण्यात आलेल्या आहेत.साफसफाई व स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था

१) सिडको एक्झिबिशन सेंटर येथे स्वच्छता आणि साफसफाई करीता एकूण ३५ कर्मचारी ३ शिफ्टमध्ये राउंड द क्लॉक कार्यरत आहेत.

२) सर्व देखरेखीकरिता सॅनिटरी अधिकारी व सॅनिटरी इन्स्पेक्टर राउंड ए क्लॉक ड्यूटी वर कार्यरत आहेत.

३) कचरा वाहतुकीकरिता एकूण ६ वाहने सिडको एक्झिबिशनसाठी स्पेशल ठेवण्यात आलेली आहेत.

४) कांदा बटाटा मार्केट येथे स्वच्छता व साफसफाई करीता एकूण १० कर्मचारी ३ शिफ्टमध्ये राउंड द क्लॉक कार्यरत आहेत.

वैद्यकीय सुविधा

१) सिडको एक्झिबिशन सेंटर येथे दोन रुग्णवाहिका तसेच पुरेशी औषधे, डॉक्टर आणि इतर कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.

२) वाशी टोल नाका, कांदा बटाटा मार्केट येथे प्रत्येकी १ रुग्णवाहिका, औषधे, डॉक्टर, इतर कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे.

३) तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये प्रत्येकी २० बेड राखीव ठेवण्यात आलेले आहेत.