शिवसेनेचे आमदार ज्या जिल्ह्यात जास्त आहेत, त्याठिकाणी पालकमंत्री पद राष्ट्रवादीने घेतले. या जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार भविष्यात जिंकूच नये यासाठीच राष्ट्रवादीचा हा डाव होता, असा आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केला. आजही आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेनेत आहोत असा दावाही त्यांनी यावेळी केला. शिवसेना पक्ष तसेच कोणत्याही नेत्याविरोधात कोणीही प्रतिक्रीया देऊ नये. ते आपले नेते असल्यामुळे त्यांच्याविरोधातील घोषणा खपवून घेणार नाही असा निरोप एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी शिंदे समर्थकांना सांगितले.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्याच्या समर्थनार्थ ठाणे जिल्ह्यात बॅनरबाजी सुरू झाली असून, त्यापाठोपाठ शनिवारी सायंकाळी शिंदे यांच्या लुईसवाडी निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली. ठाण्याच्या माजी महापौर व ठाणे जिल्हा महिला प्रमुख मिनाक्षी शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी समर्थकांशी संवाद साधून शिंदेसोबत असण्यामागची भुमिका स्पष्ट केली. ठाणे जिल्हाच नव्हे तर त्याबाहेरील जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांनी काम केले आहे. त्यामुळेच ते कसे बरोबर आहेत, हे सांगत लोक त्यांना समर्थन देत आहेत. शिंदे यांनी अद्याप शिवसेना सोडलेली नसून ते आजही शिवसैनिकच आहेत, असा दावा खासदार शिंदे यांनी केला.

शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार असून ही इतिहासातील पहिली घटना आहे. आमदारांनी विश्वास दाखवला, त्याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या मनात धुसफूस होती, त्याचा स्फोट झाला आहे. अडीच वर्षांपासून आघाडीत आहोत. त्यातून बाहेर पडलो पाहिजे असे का प्रत्येकाला वाटले. कुठे तरी चुकत असेल म्हणूनच प्रत्येकाला असे वाटत होते. एकनाथ शिंदे यांनाच नव्हे इतर ५० आमदारांची तीच भावना आहे. कारण, प्रत्येकाला एकसारखाच त्रास होतो आहे, असेही खासदार शिंदे म्हणाले.

सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या मोठी असून याठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. याठिकाणी उस विकण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना आधी पक्ष विचारला जातो, जर त्याने शिवसेना सांगितले तर त्याला शेवटी उभे केले जाते असा आरोपही त्यांनी केला. अडीच वर्षात दोन्ही काँग्रेसने शिवसेना कशी संपले याचाच विचार केल्याचा आरोपबी त्यांनी केला. आमदारांनी आपली कैफीयत मांडली. पण, त्यांचे ऐकले गेले नाही. त्यांची ही कैफीयत शिंदे यांनी ऐकली. त्यामुळे शिंदे किंवा इतर आमदारांनी घेतलेला निर्णय चुकीचा कसा, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. या आमदारांच्या घरांवर कार्यालयावर दगडफेक केली जात आहे. हि काय मोगलाई आहे का, आम्ही एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे शिवसैनिक आहोत, आम्ही शांत आहोत, आमची माथी भडकवण्याचे काम करु नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्यात आमचा मुख्यमंत्री असल्यामुळे चांगले दिवस येतील, अशी लोकांना अपेक्षा होती. पण, आजही शिवसेना कार्यकर्ता फक्त लढतोय. सत्ता आली मात्र ती कार्यकर्त्यांपर्यंत पोहचलीच नाही. स्वपक्षीय आमदारांना निधी मिळत नाही. सत्ता असून कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल तर त्या सत्तेचा काय फायदा असे मतही त्यांनी व्यक्त केले.

राज्यात शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत असतांना ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. त्यांनी जिल्ह्यात विकासकामांसाठी निधी दिला. त्यांनी पक्ष वाढीचाच नेहमी विचार केला. त्यामुळे त्यांनी जे केले ते योग्यच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी अद्याप शिवसेना सोडलेली नाही, ठाण्यातील सर्व ६७ माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिवसेनेसोबत म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याला आणि लोकांना सांभाळले, असे नरेश म्हस्के यांनी सांगितले.