scorecardresearch

Video: “गेल्या ३५ दिवसांत तर सगळ्या मर्यादा पार…”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्वीट; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत थेट मुख्यमंत्र्यांचा केला उल्लेख!

आव्हाड म्हणतात, “हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी केलं, तर ते गुंड. मग पोलीस छळणार. स्वत: मुख्यमंत्री…!”

jitendra awhad
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला 'तो' व्हिडीओ! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगर पालिकेतील अधिकारी महेश अहिर यांच्यावरील आरोपप्रकरणी चर्चेत आहेत. जितेंद्र आव्हाडांनी यासंदर्भात नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आवाज उठवला होता. त्यावर महेश अहिर यांच्याकडील पदभार काढून घेत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांत राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याप्रकरणीही आव्हाडांनी आक्रमक भूमिका मांडली होती. सरकारविरोधात विविध मुद्द्यांवर आक्रमक होणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील एका घटनेचा व्हिडीओ ट्वीट करून राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती एका खुर्चीवर बसलेल्या मध्यमवयीन व्यक्तीला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. तसेच, या व्यक्तीला सातत्याने सोशल मीडियावरची एक पोस्ट डिलीट करून माफी मागण्यासही सांगत आहेत. “आमच्या साहेबांबद्दल तू का बोलतोस?” असा प्रश्नही मारहाण करणाऱ्या व्यक्ती विचारताना व्हिडीओत दिसत आहेत. अखेर या व्यक्तीने त्यांच्यासमोर सोशल मीडियावरची पोस्ट डिलीट करून “शिंदे साहेबांची जाहीर माफी मागतो”, असं म्हटल्यानंतरच त्याची मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सुटका झाली.

मारहाण करणारे शिंदे गटाचे पदाधिकारी?

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणारे शिंदे गटाचे ठाण्यातील पदाधिकारी होते. तसेच, ज्या व्यक्तीला मारहाण होत होती, ती व्यक्ती ठाण्यातील काँग्रेसची पदाधिकारी आहे. या प्रकरणावरून इतर पक्षीय नेत्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधातही हाच न्याय का लावला जात नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आव्हाडांनी या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणारा ठाणे काँग्रेसचा प्रवक्ता गिरीश कोळी याला शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक यांनी चोप दिला. तसेच, ती आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आली व माफी मागण्यात आली. हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी केलं, तर ते गुंड. मग पोलीस छळणार. स्वत: मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार. जेलमध्ये सडवणार”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप नोंदवला आहे.

“मी सगळं तीन वर्षांपासून अनुभवतोय”

दरम्यान, या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाडांनी या प्रकारावरून सूचक शब्दांत सरकारला लक्ष्यही केलं आहे. “हे सगलं मी गेले तीन वर्षं अनुभवतो आहे. गेले ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार”, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 08:16 IST

संबंधित बातम्या