मोबाईल हा राक्षस असून तो तुम्हाला कधी गिळंकृत करेल, हे तुम्हालाही समजणार नाही. त्यामुळे मोबाईलचा वापर संपर्कापुरताच ठेवा. सकाळी चहा-नाश्ता करताना वृत्तपत्र वाचा. तुम्हाला जगाचे ज्ञान मिळेल, हे मी ठामपणे सांगतो, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजकाल मुले पालकांचे ऐकत नाहीत, अशी नियमित तक्रार येत असते. मात्र, माझे असे प्रामाणिक म्हणणे आहे की मुले फक्त आईच्या डोळ्यांना घाबरतात. जगात ते दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला घाबरत नाहीत. चुकल्यावर मुलाची कॉलर आईने पकडलीच पाहिजे. जर, त्याचे लाड केले तर नक्कीच मुले हातात राहणार नाहीत. पहिल्या चुकीतच त्याला धडा शिकवला तरच ते आयुष्यात चुका करणार नाहीत. तसेच मुलांनी असे म्हणणे की आईवडील दबाव टाकतात, हे चुकीचे आहे. कारण, मुलांना वाढवताना आईने घेतलेल्या कष्टाची जाणीव कधी मुले ठेवतात का? याचा विचार मुलांनी करावा, असेही आव्हाड म्हणाले.

महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला शिकवून देशाला सुशिक्षित केले. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांनी जर शाळा सुरु केली नसती तर आज इथे एकही मुलगी उपस्थित राहू शकली नसती. त्यामुळे इतिहासातील अशी काही माणसे आहेत की त्यांनी आपले आयुष्य घडविले आहे. त्यामुळे तुम्ही जो इतिहास शिकता आणि समाजात पसरवला जातो. तो खरा इतिहास नाही. खऱ्या इतिहासाचा शोध घ्या, असे सांगत आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य उधृक्त केले.

मुलांशी संवाद साधताना आव्हाड यांनी त्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. मोबाईलचे जग हे अभासी जग आहे. सोशल मिडीयावर आपण दिलेल्या कमेंट, लाईकनुसार आपल्या मनाचा वेध घेऊन आपणाला बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोबाईल हे संपर्काचे उत्कृष्ठ साधन आहे. पण, त्याचा अतिवापर हा आपल्यासाठी नुकसानदायकच आहे. त्याच्या जाळ्यात आपण अडकलो की हा मोबाईलरुपी राक्षस आपणाला गिळकृंत करेल. त्यामुळेच मोबाईल हातात घेण्यापूर्वी वृत्तपत्र वाचा. कारण, वृत्तपत्रातूनच जागतिक ज्ञान आपल्या पदरीन पडेल, असेही डॉ. आव्हाड म्हणाले. यावेळेस विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षित लोक राजकारणात दिसत नाहीत, याबद्दल विचारले असता, शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सामाजिक जबाबदारी घेण्याची जाणीव असलेले लोकच राजकारणात येत असतात. आजचा हा कार्यक्रम आयोजित करणारे आनंद परांजपे हे मॅकेनिकल इंजिनिअर असून त्यांनी एमबीएखील केले आहे. त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारीचे भान असल्यानेच त्यांनी राजकारणात येऊन आशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असेही म्हटले.

या कार्यक्रमात डॉ. अजित जोशी (सी.ए.) यांनी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सुमारे 1438 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी दहावीमध्ये ९०ते १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये प्रेम गिरीश कोंगरे आणि अनुष्का देविदास शिंदे यांना लॅपटॉप, ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमधून केतकी धनंजय पाटील आणि चाँदणी उमाशंकर वर्मा तर १२ वीमध्ये ८० ते १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमधून अनुप्रित विनोद कांबळे आणि ७० ते ८० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमधून दर्शन राजेंद्र भौसे यांना टॅब देण्यात आला. तसेच, १ हजार ४३८ विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक, सन्माचिन्ह आणि एक शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jitendra awad advice to students is to leave your mobile phone aside and read the newspaper amy
First published on: 06-08-2022 at 15:52 IST