ठाणे : महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू असतानाही प्रशासक म्हणून काम पाहणारे आयुक्त डाॅ. विपीन शर्मा हे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासोबत शहरात दौरे करण्याबरोबरच पत्रकार परिषदा घेत असून त्यास राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी आक्षेप घेत आयुक्तांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. ठाण्यात राष्ट्रवादी भक्कम असल्याने फुट पडणार नसल्याचा दावा करत ज्यांना गदारी करायची सवय असते, त्यांच्या मनात तशाच भावना येणार असल्याचा टोला त्यांनी म्हस्के यांना लगावला.

ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत मार्च महिन्यात संपुष्टात आली. महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा हे प्रशासक म्हणून काम पहात आहेत. प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून ते शहराच्या विविध भागात दौरे करत आहेत. या दौऱ्यांमध्ये माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक सामील होत आहेत. याच मुद्द्यावरून आयुक्तांवर भाजपने टिका केल्याने त्यांचे दौरे वादात सापडले होते. त्यानंतर आयुक्त शर्मा यांच्या दौऱ्यात भाजपचे माजी नगरसेवक सामील झाल्याचे दिसून आले होते. या वादावर पडदा पडलेला असतानाच, आता राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी आयुक्तांच्या दौऱ्यांवर आक्षेप घेतला आहे.

आयुक्त शर्मा यांना प्रशासक असल्याचा विसर पडला आहे. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आलेली आहे. १३१ नगरसेवक, महापौर तसेच इतर पदाधिकारी आता पदावर नसून ते सर्व आता सर्वसामान्य ठाणेकर आहेत. असे असतानाही आयुक्त शर्मा हे माजी महापौर तसेच शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांसोबत दौरे करत असतील तर ते चुकीचे असून याबाबत मुख्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितले. प्रशासक असल्यामुळे आयुक्तांनी स्वतंत्रपणे दौरे करावेत. पण, त्यात पालिकेच्या माजी पदाधिकारी व नगरसेवकांना सोबत घेऊ नये. तसेच महापालिका निवडणुकीनंतर निवडूण येणाऱ्या पदाधिकारी आणि नगरसेवकांसोबत दौरे करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी भक्कम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला होता. त्यास आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात पक्षाचे काम सुरु असून राज्यपालांविरोधात केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे सर्वच माजी नगरसेवक आणि पदाधिकारी सामील झाले होते. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादी भक्कम असल्याने फुट पडणार नसल्याचा दावा त्यांनी केला. तर, ज्यांना गदारी करायची सवय असते, त्यांच्या मनात तशाच भावना येणार असल्याचा टोला त्यांनी म्हस्के यांना लगावला.