ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष सुहास देसाई यांनी पक्षाला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केला. शहराध्यक्षच पक्षाला सोडून गेल्याने शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. असे असतानाच, आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरू असतानाच, आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक असलेले मनोज प्रधान यांच्याकडे पक्षाने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात पक्ष प्रवेशाची मालिका सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशाच्या निमित्ताने अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पक्षाचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्षपदी माजी नगरसेवक मनोज प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रधानांच्या नावाची घोषणा
जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. विद्यमान कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी अध्यक्षपदासाठी मनोज प्रधान यांचे नाव सुचविले. या बैठकीत जवळपास सर्वच कार्यकर्त्यांनी मनोज प्रधान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबईत प्रधान यांच्या नावाची घोषणा केली.
कोण आहेत प्रधान
डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेले प्रधान हे मितभाषी आहेत. उच्चशिक्षित असलेल्या प्रधान यांनी काही काळ ठाणे महानगर पालिकेत नगरसेवक पदही भूषविले आहे. प्रखर काँग्रेसी विचारांचे असलेले प्रधान हे विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक जीवनात कार्यरत असून काँग्रेस एकसंघ असताना ते युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे ते शहराध्यक्षही होते.
वादग्रस्त कारकिर्द
ठाणे जिल्ह्य़ातील वज्रेश्वरी भागात श्री वज्रेश्वरी योगिनी संस्थानाचे मंदिर आहे. २०१४ ते २०१८ या कालावधीत मनोज प्रधान याच्याकडे मंदिराचे अध्यक्षपद होते. या कालावधीत संस्थानाला मिळालेल्या देणगीचा अपहार केल्याप्रकरणी मनोज प्रधान याच्या विरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. मात्र, ठाणे सत्र न्यायालयाने जानेवारी महिन्यात त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता.