ठाणे : ज्येष्ठांच्या मूलभूत गरजा मुलांनी भागवण्यास नकार दिला किंवा दुर्लक्ष केले तर तो दखलपात्र गुन्हा असतो. त्यासाठी तीन महिन्याची कैद आणि पाच हजार रुपयांच्या दंड आहे, अशी माहिती महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे ॲड प्रमोद ढोकले यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यशाळेत बोलताना दिली.समाज कल्याण आयुक्त, ठाणे आणि फेस्कॉम कोकण विभाग यांच्यावतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जनजागृती दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत ज्येष्ठ नागरिकांना अत्याचाराची व्याख्या, कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधक कायदे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ही कार्यशाळा सामाजिक न्याय भवन, कळवा येथे पार पडली. यावेळी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे ॲड प्रमोद ढोकले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक संघानी आपापल्या संघात समुपदेशन कक्ष स्थापन करून ज्येष्ठांच्या अत्याचारावर जनजागृती करावी. तसेच ज्येष्ठांच्या मूलभूत गरजा मुलांनी भागवण्यास नकार दिला किंवा दुर्लक्ष केले तर तो दखलपात्र गुन्हा असतो. त्यासाठी तीन महिन्याची कैद आणि पाच हजार रुपयांच्या दंड आहे.
त्याचबरोबर ज्येष्ठांवर अत्याचार करणे त्यांचा मानसिक शारीरिक आणि आर्थिक छळ करणे हा दखलपात्र गुन्हा असून अशा व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करता येतो, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच पोलिसांनी जेष्ठांना गुन्हा नोंदवण्याच्या बाबतीत सहकार्य करून छळ करणाऱ्या व्यक्तींना समज द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे पोलिस अधिकाऱ्यांनी ज्येष्ठांच्या संघटनांबरोबर नियमित संपर्क ठेवल्यास ज्येष्ठांच्या छळाचे प्रमाण निश्चित कमी होईल असे मत ॲड.ढोकले यांनी व्यक्त केले. ज्येष्ठांनी आपले मनःस्वास्थ्य चांगले राखणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचन,संगीत, नृत्य अशा गोष्टी शिकले पाहिजे. यामुळे मेंदूतील पेशी अधिक चांगल्या रीतीने सक्रिय होतात असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ अद्वैत पाध्ये यांनी सांगितले.