ठाणे : भारताचा अग्रगण्य फंड-आधारित रिअल इस्टेट डेव्हलपर निओलिव्हने रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात मोठा मिश्र-वापर व्हिला प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उच्च दर्जाचे व्हिला, निवासी भूखंड आणि अपार्टमेंट्सचा समावेश असेल. या प्रकल्पासाठी ४७ एकर जमिन संपादित करण्यात आली आहे. यामुळे निओलिव्ह कंपनीने प्रचंड मागणी असलेल्या मुंबई महानगर प्रदेशात आपला ठसा उमटवला आहे. हा प्रकल्प नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकपासून अवघ्या एका तासाच्या अंतरावर असून, इमॅजिका थीम पार्कच्या अगदी जवळ आहे. हिरवाईने नटलेल्या परिसरात जागतिक दर्जाचा निवासी समुदाय उभारण्याचे निओलिव्हचे उद्दिष्ट आहे.

या प्रकल्पात प्रीमियम व्हिला, प्लॉट्स, किरकोळ सुविधा आणि जीवनशैलीसाठी आवश्यक सोयींसह जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी एकूण विकास मूल्य (Gross Development Value) सुमारे ६०० कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, हा प्रदेशातील पहिला थीम-आधारित प्रकल्प ठरणार आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्लबही यामध्ये असणार आहे. रहिवाशांना सुरक्षित, आधुनिक, शाश्वत आणि एकात्मिक जीवनशैलीचा अनुभव देणारे हे एकमेव ठिकाण ठरणार आहे.

या कराराविषयी निओलिव्हचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मल्होत्रा म्हणाले, “हा करार आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. देशातील सर्वात मागणी असलेल्या मायक्रो-मार्केटपैकी एकामध्ये आमचा सर्वात मोठा विस्तार याच्या माध्यमातून होत आहे. UHNI (Ultra High Net-worth Individual) अत्यंत उच्च संपत्ती असलेल्या गुंतवणूकदारांचे पाठबळ, SEBI-अनुमोदित फंड आणि १०० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या तज्ज्ञ टीमच्या साहाय्याने आम्ही दर्जेदार निवासी प्रकल्प उभारण्यास कटिबद्ध आहोत.” पनवेल-खालापूर-खोपोली हा पट्टा अलीकडच्या काळात वेगाने विकसित होत आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्ग तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्यामुळे या पट्ट्याला मोठे आर्थिक आणि पायाभूत बळ मिळत आहे.

मिश्र वापर व्हिला प्रकल्प म्हणजे काय?

मिश्र वापर व्हिला प्रकल्प म्हणजे असा प्रकल्प ज्यामध्ये केवळ राहण्यासाठी घरे किंवा व्हिला नसून, दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये आलिशान व्हिला किंवा प्लॉट्ससोबतच किराणा दुकाने, औषधांची दुकाने, कॅफे यांसारख्या किरकोळ सोयी असतात. त्याचबरोबर क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम, उद्याने, खेळाची मैदाने यांसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येतात. काही प्रकल्प ठराविक थीमवर आधारित विकसित केले जातात, जसे की रिसॉर्ट-स्टाईल, निसर्गस्नेही संकल्पना किंवा आधुनिक स्मार्ट होम्स. त्यामुळे असा प्रकल्प केवळ राहण्यासाठी नसून, संपूर्ण जीवनशैली आणि दैनंदिन सोयी एका ठिकाणी मिळवून देतो. म्हणूनच त्याला “मिश्र वापर” प्रकल्प असे म्हटले जाते.