स्थानिक कंपनीतून राज्यभरात दररोज १७० ते १८० टन पुरवठा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर : करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने प्राणवायूची मागणीही वाढल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. राज्याला लागणाऱ्या एकूण प्राणवायूच्या सुमारे १७० ते १८० टन द्र्रवरूप प्राणवायू  मुरबाड तालुक्यातून पुरवला जात असल्याचे समोर आले आहे. मुरबाडच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रॅक्सएअर या कंपनीतून दररोज नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना प्राणवायू पुरवला जातो आहे. या कंपनीत हवेतला प्राणवायू मिळवून त्याचे द्रवात रूपांतर केले जाते. यामुळे राज्याला मोठा आधार मिळाला आहे.

जिल्ह्यात आणि एकूणच राज्यात प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला असून प्राणवायू मिळवण्यासाठी पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका रुग्णालयातील रुग्णांना प्राणवायूचा साठा संपत असल्याने तातडीने हलवण्याची वेळ आली होती. एकीकडे जिल्ह्यात प्राणवायूचा तुटवडा असला तरी ठाणे जिल्ह्यातच सर्वाधिक प्राणवायूचे उत्पादन घेतले जाते आहे. नवी मुंबईतील लिंडे आणि मुरबाडमधील प्रॅक्सएअर या कंपन्यांमध्ये दररोज शेकडो द्रवरूप प्राणवायू तयार केला जातो आहे. मुरबाड नगर पंचायत हद्दीत असलेल्या औद्योगिक वसाहतीत प्रॅक्सएअर ही गेल्या सात वर्षांपासून हवेतले निरनिराळे वायू वेगळे करत असते. गेल्या वर्षात या कंपन्या एकत्र झाल्या. सात वर्षांपासून औद्योगिक कंपन्यांना पोलाद निर्मितीसाठी प्राणवायू देणाऱ्या मुरबाड येथील प्रॅक्सएअर कंपनी सध्या दररोज १७० ते १८० टन द्रवरूप प्राणवायूची निर्मिती केली जाते. नायट्रोजनही या कंपनीत मिळवला जातो. मात्र सध्या प्राणवायूची गरज पाहत कंपनीने अन्न व औषध प्रशासनाच्या मागणीनंतर फक्त प्राणवायूवर लक्ष केंद्रित केले आहे. येथून ठाणे जिल्ह्यासह नाशिक, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही प्राणवायू पुरवला जातो. रुग्णालयांमध्ये सध्या वाढलेली प्राणवायूची मागणी पाहता या कंपनीने उद्योगांना प्राणवायू देणे बंद केले आहे, अशी माहिती प्रॅक्सएअर कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक प्रमोदकुमार बेहरा यांनी दिली आहे.

वाढत्या तापमानामुळे चिंता

हवेतल्या वायूतून ऑक्सिजन, नायट्रोजन आणि पार्टिकल असे वेगवेगळे करणाऱ्या या कंपन्यांना प्राणवायूच्या निर्मितीसाठी निसर्गाची साथ लागते. जितके तापमान मध्यम आणि आद्र्रता नियंत्रित तेवढा प्राणवायू निर्मितीला हातभार लागतो. तापमानवाढ झाल्यास प्राणवायू मिळवण्यात अडचणी येतात. सध्याची वाढणारी प्राणवायूची मागणी आणि वाढणारे तापमान हे परस्परविरोधी गोष्टी होत असल्याने त्यांची चिंता अधिकाऱ्यानी व्यक्त केली आहे.

मुरबाड, बदलापूरसाठी १० टन प्राणवायू

मुरबाड तसेच बदलापूर येथील कोविड रुग्णालयांसाठी दहा टन प्राणवायू राखीव ठेवण्याचा निर्णय कंपनीसोबत अन्न व औषध प्रशासन, तहसीलदार आणि आमदार किसन कथोरे यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New murbad oxygen supply center akp
First published on: 24-04-2021 at 00:01 IST