डोंबिवली – मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वे स्थानकातील जमिनीलगतचे आणि उन्नत कोपर रेल्वे स्थानक (दिवास-वसई मार्गावरील) जोडणारा पादचारी पूल कोणत्याही उद्घाटनाविना मध्य रेल्वे प्रशासनाने खुला आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे मार्गातून उड्या मारत येण्याचा, जुना अवघड जिना चढण्याचा त्रास वाचला आहे.

कर्जत, कसारा, बदलापूर, टिटवाळा, शहापूर भागातून रेल्वेने येणारा पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वसई, विरार, डहाणू, पालघर, बोईसर भागात नोकरी, व्यवसायासाठी जाणारा बहुतांशी नोकरदार वर्ग मध्य रेल्वेच्या कोपर जमिनीलगतच्या रेल्वे स्थानकात उतरतो. तो प्रवासी तेथून अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून पनवेल, दिवा रेल्वे स्थानकातून येणाऱ्या शटल सेवेने वसई, विरार भागात पोहोचतो.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात करोनाचा संसर्ग ओसरू लागला; करोना रुग्णसंख्येत घट

अप्पर कोपर रेल्वे स्थानकामुळे प्रवाशांचा दादरला वळसा घालून वसईकडे जाण्याचा त्रास वाचतो. गुजरात, वापीकडे जाणारे बहुतांशी व्यापारी अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून वसई, विरार भागात जातात. मग बोरिवली, वसई, पालघरहून गुजरातकडे जातात. अप्पर कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी वाढली आहे. जमिनीलगतच्या स्थानकातून अप्पर कोपर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी अरुंद पादचारी जिना होता. प्रवाशांची सकाळ, संध्याकाळ या जिन्यावरून येजा करताना झुंबड उडत होती. पावसाळ्यात छत्री घेऊन येजा करताना प्रवाशांची चेंगराचेंगरी होत होती. कोपर रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी विचारात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने जमिनीलगतचा आणि अप्पर कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान पादचारी पूल उभारण्याचे काम गेल्या वर्षी सुरू केले होते. हे काम आता पूर्ण झाले आहे. जुन्या पुलावरील पादचाऱ्यांचा वाढता भार विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने नवीन पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे.

लाद्यांवर घसरगुंडी

जिन्यावरील लाद्या टाईल्स पद्धतीच्या गुळगुळीत आहेत. आताच या जिन्याच्या पृष्ठभागावरून चालताना पाय घसरतो. पावसाळ्यात या जिन्यावरील गुळगुळीत लाद्यांवर पाय घसरून पादचारी पडण्याची भीती प्रवासी व्यक्त करत आहेत. जिन्यांवर नेहमी ठेकेदाराकडून खडबडीत लाद्या बसविल्या जातात. या जिन्यावर गुळगुळीत पाय घसरणाऱ्या लाद्या बसवून रेल्वेने नक्की काय साध्य केले आहे, असे प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत. रेल्वे अधिकारी याविषयी बोलण्यास तयार नाहीत.

हेही वाचा – कल्याण पूर्वेत आडिवली-ढोकळीत बेकायदा इमारतींचे मल-सांडपाणी रस्त्यांवर; दुर्गंधीने रहिवासी, प्रवासी हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“उन्नत कोपर रेल्वे स्थानकाला जोडणारा पूल रेल्वेने तातडीने सुरू केल्यामुळे जुन्या पुलांवरून येजा करताना जी झुंबड उडायची ती आता कमी होईल. प्रवाशांना झटपट अप्पर, जमिनीलगतच्या स्थानकात लोटालोटी न करता येजा करता येईल. या जिन्यावर बसविलेल्या लाद्या मात्र गुळगुळीत असल्याने पावसाळ्यात त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.” असे प्रवासी, ॲड. सुनील प्रधान म्हणाले.