ठाणे : महापालिका क्षेत्रातील वाढती बांधकामे आणि वाहन संख्येमुळे धुळ प्रदुषणात वाढ होत असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने आता पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धुळ प्रदुषण रोखण्यासाठी पालिकेने नवी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांची विविध कामे करत असताना धुळ प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या नाहीतर पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे शहरात आता धुळ प्रदुषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिककरण झाले आहेत. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय, शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. मेट्रो, उड्डाण पुल, रस्ते बांधणी अशी विकासकामेही सुरु आहेत. वाढती बांधकामे आणि वाहने यामुळे धुळ प्रदुषणात वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने आता पाऊले उचलली आहेत. स्वच्छ हवा कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नवी नियमावली तयार केली आहे. या आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत ठाणे महापालिकास्तरावर नुकतीच आढावा घेण्यात आली. या बैठकीस ठाणे शहरातील विकासक, आरएमसी प्लांटचे चालक, रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार, मेट्रो रेल्वेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त -२ संजय हेरवाडे यांनी नियमावलीच्या पालनाबद्दल निर्देश दिले. तसेच, पायाभूत सुविधांची विविध कामे करत असताना धुळ प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना केली नाहीतर पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी उपस्थितांना ठाण्यातील हवेच्या प्रदूषणाबाबत माहिती दिली. तर, प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण विभागाचे दक्षता पथक तयार करण्यात येणार असल्याचे उपायुक्त अनघा कदम यांनी सांगितले.

हेही वाचा… अर्थशास्त्राचा पेपर देऊन नववधू थेट विवाह मंडपात, कल्याण जवळील जीवनदीप महाविद्यालयातील घटना

काय आहे नियमावली

इमारतीचे बांधकाम – इमारतीच्या बांधकामाभोवती सर्वत्र पत्रे लावणे. इमारतीचे प्लास्टर करताना संरक्षक जाळी लावणे. बांधकामाच्या वेळी डेब्रिज टाकण्यासाठी प्लास्टिक गार्बेज ड्रमचा वापर करणे आवश्यक आहे. रेती, माती आणि सिमेंट यामुळे होणारे धूळ प्रदूषण टाळण्यासाठी वॉटर स्प्रिंकलरचा वापर करावा. इमारतीच्या बांधकामासमोरील रस्त्याची धूळ कमी करण्यासाठी रेन गनचा वापर करणे. बांधकाम साहित्याची वाहतूक करताना ट्रक ताडपत्रीने झाकलेले असावेत. इमारतीचे बांधकाम करतेवेळी तोडफोड कचऱ्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून परवानगी घ्यावी.

हेही वाचा… फेरिवाल्यांना कंटाळून जांभळी नाका भाजी मंडई उद्यापासून बंद; बेकायदा फेरिवल्यांमु‌ळे मंडईतील व्यवसायावर परिणाम

आरएमसी प्लांट – धूळ प्रदूषण टाळण्यासाठी वॉटर स्प्रिंकलरचा वापर करावा. प्लांट सभोवताली सर्वत्र बॅरिकेडिंग करणे. आरएमसी प्लांट अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे. तोडफोड सामुग्रीची वाहतूक करताना ट्रक ताडपत्रीने झाकलेले असावेत. ट्रान्झिट मिश्रण वाहनांसाठी प्रवेश आणि बाहेर पडतानाच्या जागी दोन स्तरांवर टायर धुण्याची सुविधा असावी.

हेही वाचा… ठाणे: ईराणी टोळीतील सोनसाखळी चोर अटकेत, आठ गुन्हे उघडकीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ते कंत्राटदार/मेट्रोचे काम – रस्ते खोदताना किंवा रस्ता दुरुस्तीचे काम करताना वॉटर स्प्रिंकलर्स/रेन गन स्प्रिंकलरचा वापर करणे. ज्या रस्त्याचे काम चालू आहे त्या रस्त्याच्या बाजूने बॅरिकेडिंग करणे. बांधकाम साहित्याची वाहतूक करताना ट्रक ताडपत्रीने झाकलेले असावेत.