पुढील वर्षी बोगदा खुला; पाचव्या-सहाव्या मार्गिकेमुळे नव्या १०० फेऱ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शलाका सरफरे, ठाणे</strong>

मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावर कळवा-मुंब्रा दरम्यान नव्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील वर्षी खुला होणाऱ्या या बोगद्यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाडय़ांच्या सेवेमध्ये १०० फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन होऊन त्याचा फायदा प्रवाशांना होऊ  शकणार आहे.

मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या एमयूटीपी २ मध्ये समाविष्ट असलेल्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा हा बोगदा भाग असून जून २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण करून हा मार्ग खुला करण्यात येणार आहे.

यापूर्वी कुर्ला ते ठाणे आणि दिवा ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचे काम पूर्ण झाले असले तरी ठाणे ते दिवा हे काम आता अंतिम टप्प्यात आले असल्यामुळे नव्या वर्षांत दिलासादायक प्रवासाच्या दृष्टीने रेल्वेचा प्रवास सुरू आहे. रेल्वे रुळांचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. याशिवाय मुंब्य्राकडील भागामध्ये रेल्वे बोगद्यालगत आणखी एक रेल्वे उड्डाणपूल तयार करून रेल्वे वाहतूक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पात अनेक अडचणी आणि अडथळे आले. जमीन संपादन, वृक्षतोडीच्या परवानग्या, वनक्षेत्र वळती करून घेणे आणि पारसिक बोगद्याजवळ पूल बांधण्याच्या कामांचा त्यात समावेश आहे.

दिव्याचा थांबा शक्य

मध्य रेल्वेच्या लांबपल्लय़ाच्या गाडय़ांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा देण्याच्या मागण्या होत असल्या तरी अपुऱ्या मार्गिकांमुळे हा थांबा शक्य नव्हता. परंतु पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे लांब पल्लय़ाच्या गाडय़ा धिम्या मार्गावरून पुढे जाणार असल्यामुळे दिवा थांबाही शक्य होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या काही गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा देऊन गर्दीचे विभाजन शक्य असल्याचाही दावा मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी  केला आहे.

पुढील काही आठवडय़ांमध्ये घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकच्या माध्यमातून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. नवा पारसिक बोगदा जून २०१९ पर्यंत सुरू करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यानंतर अंदाजे उपनगरीय गाडय़ांच्या १०० फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे.

– संजय सिंह, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन

१३० कोटी रुपये दहा वर्षांपूर्वी  प्रकल्पासाठीचा गृहित खर्च.

४०० कोटींहून अधिक अंदाजित खर्च.

२०१९ मध्ये या नव्या बोगद्यातून उपनगरीय गाडय़ांची सेवा सुरू होऊ शकेल.

२०० मीटर लांबीचा कळवा-मुंब्रा दरम्यान नवा बोगदा

२००९ मार्गिकेच्या कामास आरंभ

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New tunnels through parsik hills will open in next year for slow train
First published on: 12-10-2018 at 03:35 IST