ठाणे : काँग्रेसमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु सांबरे यांनी वंचितकडून उमेदवारी नव्हे तर केवळ पाठींबा असल्याचे सांगत अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी घोषित केली होती. या जागेवर जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे काँग्रेसतर्फे इच्छुक होते. परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने निलेश सांबरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. असे असतानाच, वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु ते वंचित बहुजन आघाडीकडून लढण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा – महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सांबरे यांनी समाज माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भिवंडी लोकसभा निवडणूक ही जिजाऊ विकास पार्टीमधून अपक्ष म्हणून लढविणार आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीने मला पाठींबा दर्शविला आहे, असे सांबरे यांनी म्हटले आहेत. जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून गेली १५ वर्षे मी स्वःखर्चाने समाजतल्या दुर्बल आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी काम करत आहे. यापुढे देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या लोकशाही मुल्यांचे जतन व्हावे तसेच त्यांच्या विचारधारेवर चालणारी सर्वसमावेशक भूमिका निभावण्याचा एक भारतीय नागरिक म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन पार्टीने दिलेल्या पाठींब्याबद्दल प्रकाश आंबेडकर तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, नेते आणि समस्त कार्यकर्ते यांचा मनापासून आभारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.