लघुशंका करण्याच्या नादात अनेक अपघात झाल्याचं आपण ऐकतो. मात्र नाशिकमधल्या मनोज जाधव या एका नऊ वर्षांच्या लहानग्याने लघुशंका करण्याच्या नादात चक्क नाशिकहून कल्याण इतका लांबचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला नाशिक ते कल्याण रेल्वे स्थानक आणि तेथून उल्हासनगर येथील बालकांचे वसतीगृह असा मोठा प्रवास करावा लागला. अखेर ठाणे शहर गुन्हे शाखेच्या बाल संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांची शोध मोहीम राबवत मनोजच्या नाशिक येथील निवास्थानाचा पत्ता शोधून मंगळवारी त्याला त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
नाशिक येथील गुलाबवाडी परिसरात मनोज जाधव आपल्या आईसमवेत राहतो. मनोज रविवार, २० मार्च रोजी नाशिक रेल्वे स्थानक परिसरात झाडांच्या छोट्या काठ्या गोळा करण्यासाठी आला होता. मनोजला लघुशंका लागल्याने तो स्थानकात उभ्या असलेल्या कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीत चढला. मात्र रेल्वेतून खाली उतरण्याच्या आधीच रेल्वे निघाल्याने तो थेट कल्याण स्थानकात उतरला.
कल्याण लोहमार्ग पोलिसांना भेदरलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी मनोजची चौकशी केली असता त्याला आपला पूर्ण पत्ता सांगता आला नाही. त्यामुळे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी उल्हासनगर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात त्याची रवानगी केली. तेथील संबधीत अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मनोजची विश्वासात घेऊन चौकशी केल्याने त्याने आपण नाशिकमधील गुलाबवाडी परिसरातील अण्णाच्या दुकानाशेजारी राहात असल्याचे सांगितले.
त्यानंतर ठाणे बालसंरक्षण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मनोजच्या कुटुंबीयांची शोध मोहीम राबविली. यादरम्यान मनोज राहत असलेले ठिकाण नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे समोर आले. बालसंरक्षण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लागलीच तेथील पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तेथील पोलिसांनी मनोजच्या घराचा शोध घेत त्याची आई कल्पना जाधव यांच्याशी संपर्क साधला. मनोजच्या आईशी संपर्क झाल्यानंतर खातरजमा करण्यासाठी मनोजचे त्याच्या आईशी मोबाईलद्वारे संभाषण घडवून आणत सदर मुलगा आपलाच असल्याचे कल्पना जाधव यांनी सांगितले.
यानंतर मंगळवार, २२ फेब्रुवारीरोजी आई आणि मुलाला उल्हासनगर बालकल्याण समितीसमोर हजार करण्यात आले. सर्व कागदोपत्री कारवाई पूर्ण झाल्यानंतर मनोजला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती संबंधित पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.