ठाणे : टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात अत्यावश्यक देखभालीची कामे करण्यात येणार असून या कामासाठी बुधवारी ठाणे शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी बुधवार, ४ जून रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, या कालावधीत घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समता नगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे १२ तासासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर भागात, स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा विभागवार पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या बंदनंतर पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. तरी, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा, पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.