शहापूर तालुक्यातील डोळखांबजवळील रोडवहाळ, तळवडा, टेंबुर्ली या गावांमध्ये मित्रमंडळीसोबत जाण्याचा अनुभव आला. निसर्गसौंदर्य, दुर्गम प्रदेश पाहणे हा त्यामागचा हेतू होता. तळवडा गावाजवळ आल्यानंतर आदल्या दिवशी रात्री मुख्य वीजवाहक तार पडून रात्री तिघांचा मृत्यू झाला, असे कळले. घटनास्थळी ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आमदार सगळे धावून आले. कारण ही मंडळी आल्याशिवाय संबंधित प्रकरणाचा पंचनामा होत नाही. पीडित कुटुंबाला भरपाई मिळत नाही. तळवाडा गावातील नागरिकांशी बोलताना असे कळले की, गावातील ग्रामपंचायतीचे कार्यालय एक ते दोन महिने बंदच असते. दाखला किंवा शासकीय दस्तऐवज काढायचा असेल तर त्यासाठी या ठिकाणी वारंवार खेटा माराव्या लागतात. पिण्याचे पाणी काही मैल अंतरावरून आणावे लागते. गावात बहुतेक वेळा वीज नसतेच. ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक बंदच आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दुर्गम गावांचा फेरफटका करावसा वाटतो की नाही, असा प्रश्न मनात निर्माण होतो.