ठाणे : प्रेषित मोहम्मद यांच्यावर एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपतून निलंबित करण्यात आलेल्या नूपुर शर्मा यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. त्यांना २२ जूनला जबाब नोंदविण्यासाठी हजर राहावे असे या समन्समध्ये म्हटले आहे. नूपुर यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात ऑल इंडिया इमाम कौन्सिल या संघटनेच्या सदस्यांनी तक्रार दाखल केली होती. त्याआधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नूपुर शर्मा या भाजपच्या प्रवक्ता असताना त्यांना २७ मे या दिवशी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात बोलविण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात एक आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानानंतर त्यांच्याविरोधात मुंबई, ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ऑल इंडिया इमाम कौन्सिल या संघटनेच्या एका सदस्यानेही मुंब्रा पोलीस ठाण्यात शर्मा विरोधात तक्रार दाखल केली होती. आक्षेपार्ह विधानानंतर शर्मा यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यातील या प्रकरणात ठाणे पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे. तसेच २२ जूनला त्यांना जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शर्मा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
