महाविकास आघाडी सरकारच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींचे तसेच कार्यकर्त्यांचे अधिकारी वर्गाकडून म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते. त्यांना कायम डावलले गेले. मागच्या अडीच वर्षाच्या काळात भाजपाच्या कार्यकर्त्याला मुघलांसारखी वागणूक दिली. मात्र, आता आमचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीसांकडे गृहखाते आणि अर्थखाते देखील आहे. यामुळे आपल्याकडे सध्या धनही आहे आणि दांडाही आहे. यामुळे अधिकारी वर्गाने भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचे तसेच लोकप्रतिनिधींची नियमात बसणारी कामे विनाकारण थांबवू नये. असे केल्यास आम्ही सोडणार नाही, असा इशारा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील अधिकारी वर्गाला दिला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा- महापालिका निवडणुकीत शिंदे गटासोबतच्या युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरच- चंद्रशेखर बावनकुळे
राज्यात सर्वात जास्त आमदार, खासदार हे भाजपाचे आहेत. राज्यातील बहुतांश महापालिकांवर भाजपाचा झेंडा आहे. भाजपची ताकद सर्वाधिक आहे. हीच ताकद येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अजून वाढवायची आहे. तसेच लवकरच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील. ठाण्यात देखील ही निवडणूक पार पडले. त्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याने दिवसातले दोन तास काढून त्यांच्या विभागातील चार घरांना भेटी द्यायच्या आहेत. तसेच येत्या निवडणुकीत ते भाजपालाच मदत करतील या प्रकारे त्यांचे मत परिवर्तन करायचे आहे. हे अभियान पुढील दोन महिन्यांसाठी राबवयाचे आहे. असा कार्यक्रम त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. तसेच प्रत्येकी कार्यकर्त्याने संपूर्ण ताकदीने हा उपक्रम राबविल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत ठाण्यात भाजपा आणि बाळासाहबांच्या शिवसेनेचा खासदार असेल. तसेच येत्या ठाणे महापालिका निवडणुकीत महापौर देखील असाच असेल. यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहान बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
हेही वाचा- सोशल मीडियावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बदनामी; डोंबिवलीतील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
उद्धव ठाकरेंचे मतांसाठी लांगुलचालन
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे सध्या एकत्र असल्यासाचे समजत आहे. मतांसाठी सध्या उद्धव ठाकरे हे कोणाचेही लांगुलचालन करत आहे, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
