डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील सततची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बहुतांशी वाहन चालक वाहतूक पोलिसांची नजर चुकवून उलट मार्गिकेतून प्रवासाला पसंती देत आहेत. या रस्त्यावर येण्या जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका आहेत. तरीही अनेक वाहन चालक छेद रस्त्याने शिळफाटा रस्त्यावर येतात. मुंब्रा दिशेकडून उलट मार्गिकेतून येऊन बदलापूर, कल्याण, डोंबिवलीचा प्रवास करत आहेत.
या उलट मार्गिकेतून वाहने नेणाऱ्यांमध्ये दुचाकी स्वार, ओला, उबर वाहन चालकांचा सर्वाधिक समावेश आहे. दिवसातून शहरांच्या वेगवेगळ्या भागात पाच ते सहा प्रवासी वाहतुकीचे उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे हे ओला, उबर चालकांचे उद्दिष्ट असते. परंतु, कल्याण शिळफाटा रस्त्यावरून प्रवास सुरू झाला तर अनेक वेळा या रस्त्यावरील कोंडीत ओला, उबर चालक अडकतात. त्यांना दिवसाचे प्रवासी फेरीचे उद्दिष्ट पूर्ण करता येत नाही. त्यामुळे ते शिळफाटा रस्त्यावरून प्रवास करताना मिळेल त्या मार्गिकेतून, छेद रस्त्यावरून प्रवास करून इच्छित स्थळी वेळेत जाण्याचा प्रयत्न करतात. ही प्रवासी वाहतुकीची खासगी वाहने, दुचाकी स्वार शिळफाटा रस्त्यावर सर्वाधिक कोंडी करतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
कल्याण शिळफाटा रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडीच्या वेळेत उलट मार्गिकेतून धावणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. शिळफाटा रस्त्यावर जागोजागी तैनात असलेले वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक यापूर्वी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून उलट मार्गिकेतून वाहने चालविणाऱ्या वाहनांचे वाहन क्रमांक दंडात्मक कारवाईसाठी कैद करत होते. परंतु, अशाप्रकारे मोबाईलच्या माध्यमातून वाहन क्रमांक कैद करून दंडात्मक कारवाई करण्यास वरिष्ठांनी प्रतिबंध केला आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस, अधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. अशा बेशिस्त वाहन चालकांना कारवाईसाठी रोखून धरले तर पुन्हा पाठीमागे उलट मार्गिकेत वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे वाहतूक पोलीस अशा उलट मार्गिकेतून येणाऱ्या वाहनांकडे बघण्या पलीकडे सध्या तरी कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.
शिळफाटा रस्त्यावरील टाटा नाका ते देसई पर्यंतच्या रस्ते बाधित शेतकऱ्यांना शासनाने मोबदला दिलेला नाही. शिळफाटा रस्त्याच्या या भागातील रस्त्याच्या सीमारेषा रूंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या करण्यात आलेल्या नाहीत. दररोज माती, चिखल असलेल्या सीमारेषेतून दुचाकी, चारचाकी वाहने धावतात. रस्त्याच्या कडेला चिखलाचा रबरबाट असतो.
शिळफाटा रस्त्यावरील छेद रस्ते, मेट्रोची कामे त्यामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडून पडले आहे. शिळफाटा रस्त्यावरील वाढती वाहन संख्या, शिळफाटा रस्त्याकडे येणारे वाढते छेद रस्ते, चौक त्या प्रमाणात कोळसेवाडी वाहतूक विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने वाहतूक पोलिसांची कोंडी सोडविताना दमछाक होत आहे.
शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेतून येणाऱ्या वाहन चालकांवर दररोज दंडात्मक कारवाई केली जाते. यापूर्वी असे दोनशेहून अधिक गुन्हे एकत्रितरित्या दाखल केले आहेत. तीच प्रक्रिया आताही सुरू आहे. रस्ते, चौकात नियुक्त वाहतूक पोलीस कोंडी सोडविण्यासाठी बाजुला झाला की वाहन चालक उलट मार्गिकेत घुसतात. – सचिन सांडभोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिळफाटा वाहतूक नियंत्रक.