बदलापूरः रायगड जिल्ह्यातील कर्जत, माथेरानसह आसपासच्या भागात तसेच बदलापूर, वांगणी परिसरात सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापुरात पाणी पाणी झाले आहे. बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदी सकाळी अकराच्या सुमारास इशारा पातळीजवळ पोहोचली होती. त्यामुळे बदलापूर चौपाटी परिसर जलमय झाला होता. बदलापूर वांगणी रस्त्यावर पाणी आले होते. तर शहरातील महत्वाचा बेलवली भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने त्यात एक चारचाकी बुडाली होती.

पहाटेपासून सुरू असलेल्या विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती. रायगड जिल्ह्यातील कर्जत, माथेरान भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बदलापुरात उल्हास नदीची पाणी पातळी १६.४६ मीटरपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे उल्हास नदीकिनारी असलेला चौपाटी परिसर पाण्याखाली गेला होता.

उल्हास नदीची इशारा पातळी ही १६.५० इतकी आहे. तर धोका पातळी १७.५० मीटर इतकी आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने या नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे चित्र होते. या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे अग्नीशमन दलाचे कर्मचारी तैनात होते. या ठिकाणी उल्हास नदीची वाढलेली पाणी पातळी पाहण्यासाठी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. ऐरवी २६ जुलैच्या आसपास होणारी ही स्थिती यंदा मे महिन्यातच झाल्याचे दिसून आले.

दुसरीकडे बदलापूर पूर्व पश्चिम प्रवासासाठी महत्वाचा असलेल्या बेलवली येथील भुयारी मार्गात पाणी साचले होते. त्यामुळे हा भुयारी मार्ग बंद होता. मात्र एका व्यावसायिक चारचाकी चालकाने धाडस करत भुयारी मार्गात सकाळी सहाच्या सुमारास चारचाकी नेली. त्यामुळे ही चारचाकी पाण्यात अडकली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थोड्या वेळात पाण्याची पातळी वाढल्याने चारचाकी पूर्णपणे बुडाली. या चारचाकी चालकाने बाहेर उडी घेत आपला जीव वाचवला. त्यानंतर रेल्वेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी साडे अकराच्या सुमारास जेसीबी यंत्राच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याला यश आले होते.बदलापूर वांगणी रस्त्यावर संतताधार पावसामुळे पाणी आले होते. त्याचवेळी कुडसावरे पूलावरही पाणी साचले होते. बदलापूर पश्चिमेतील बाजारपेठ परिसरातील अनेक दुकानांमध्ये सकाळी पाणी शिरले. त्यामुळे शहरात पुरसदृश स्थिती जाणवत होती.