डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील बापूसाहेब फडके रस्त्यावर सकाळी साडे सहा वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत विविध कंपन्या, खासगी आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस उभ्या असतात. या खासगी बसमुळे मागील काही महिन्यांपासून सकाळच्या वेळेत फडके रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. खासगी बस चालकांनी फडके रस्त्याला वाहनतळाचे स्वरूप आणले होते. या विषयी नागरिक, व्यापाऱ्यांच्या तक्रारी वाढल्याने डोंबिवली वाहतूक विभागाने बुधवारी सकाळी या खासगी बसवर दंडात्मक कारवाई केली.

डोंंबिवली परिसरातील कामगार, कर्मचाऱ्यांना, काही खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी खासगी बस सकाळी सहा वाजल्यापासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील वर्दळीच्या बापूसाहेब फडके रस्त्यावर वाहन चालक उभे करतात. बाजीप्रभू चौक ते मदन ठाकरे चौकापर्यंत एका रांगेत या बस उभ्या असतात. रेल्वे स्थानकाजवळ हा बस थांबा असल्याने कर्मचाऱ्यांना सोयीस्कर आहे. सकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत फडके रस्त्यावर खासगी बस एकापाठोपाठ एक उभ्या करून ठेवण्यात येत असल्याने केडीएमटी, एसटी बस आणि इतर वाहनांना या रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड होत होते. खासगी शाळांच्या बस फडके रस्ते भागातून सकाळच्या वेळेत वाहतूक करतात.

फडके रस्ता गणेश मंदिराकडून बाजीप्रभू चौकाकडे येणाऱ्या एकेरी मार्गासाठी वाहनांना खुला आहे. नेहरू रस्त्यावर काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे बहुतांशी वाहने फडके रस्त्यावरून रेल्वे स्थानकाकडून गणेश मंदिर दिशेने वाहतूक करतात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फडके रस्ता वाहतूक कोंडीने गजबजलेला असतो. या वाहन कोंडीमुळे या रस्त्यावरील व्यापाऱ्यांना सकाळच्या वेळेत आपली वाहने उभी करण्यास जागा मिळत नाही. आपल्या बसमधील सर्व कर्मचारी आल्याशिवाय खासगी बस चालक फडके रस्त्यावरून आपले वाहन हटवत नव्हते. दररोज नागरिक, व्यापारी यांच्यात वाद होत होते. या विषयी वाढत्या तक्रारी आल्याने बुधवारी सकाळी डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस, वाहतूक सेवक अचानक फडके रस्त्यावर आले. त्यांनी खासगी बस चालकांवर दंडात्मक कारवाई केली.

वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू होताच बस चालकांनी फडके रस्त्यावरून वाहने काढण्यास सुरूवात केली. तोपर्यंत वाहतूक पोलिसांनी अनेक खासगी बसवर ई चलान माध्यमातून दंडात्मक कारवाई केली. हा रस्ता नंतर वाहतुकीसाठी पूर्ण मोकळा झाला. वाहतूक विभागाने कारवाई सुरू करताच या भागातील रहिवासी, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडके रस्त्यावर सकाळच्या वेळेत खासगी बस वाहनतळासारख्या उभ्या केल्या जातात. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी नागरिक, व्यापाऱ्यांकडून आल्या होत्या. बुधवारपासून हा रस्ता अडविणाऱ्या खासगी बस, वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई दररोज केली जाणार आहे. – श्रीराम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक विभाग.