ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या गायमुख घाटात रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. या रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी १८ ते २० मे या कालावधीत दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ यावेळेत वाहतुक बदल केले जाणार आहे. हे वाहतुक बदल अवजड वाहनांसाठी असतील. अवजड वाहनांची वाहतुक भिवंडी, वसई येथून पर्यायी मार्गे वळविण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावर कोंडीची समस्या भेडसावणार आहे.

उरण जेएनपीटी बंदर, भिवंडी येथून सुटणारी हजारो अवजड वाहने गुजरात, वसईच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी घोडबंदर मार्गाचा वापर करतात. घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्याची स्थिती वाईट होती. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करावी यासाठी काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची दुरुस्ती केली होती. या मार्गिकेवर आता डांबराचे थर टाकले जाणार आहे. त्यामुळे या कामासाठी गायमुख घाट पुढील तीन दिवस दुपारच्या वेळेत अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. येथून हलक्या वाहनांची वाहतुक सुरु राहील अशी माहिती वाहतुक विभागाने दिली.

मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने नाशिक मार्गे खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील. मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारेगाव खाडी पूल, खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे जातील. नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहनांना मानकोली येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मानकोली पूलाखालून उजवे वळण घेऊन अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.

गुजरात येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेशबंदी असेल. तसेच मुंबई, विरार, वसई येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना फाऊंटन हाॅटेल येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने चिंचोटी नाका येथून कामण, अंजुरफाटा, मानकोली, भिवंडी मार्गे वाहतुक करतील. हे वाहतुक बदल १८ ते २० मे या दिवशी दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ यावेळेत लागू असतील.