ठाणे – गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात साश्रुनयनांनी ठाणे जिल्ह्यातील गणेशभक्त दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देत आहेत. ठाणे जिल्ह्यात ४३ हजार ६८४ दीड दिवसाचे गणपती विरजमान झाले होते. त्यापैकी ६ गणपती सार्वजनिक मंडळात तर, उर्वरित ४३ हजार ६७८ घरगुती गणपती आहेत. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाला गुरुवारी दुपार पासून सुरुवात झाली आहे.
भक्तीमय वातावरणात गणेशभक्त हे गणपतीला निरोप देता आहेत.वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात बुधवारी गणपतीचे घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळात आगमन झाले. ठाणे जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ८४२ गणपती मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. त्यात, १ हजार ६० सार्वजनिक तर, १ लाख ५६ हजार ७८२ घरगुती गणपतींचा समावेश होता.
गुरुवारी दीड दिवसांच्या गणपतींना निरोप दिला जात आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर अशा जयघोषात गुरुवारी दुपार पासून दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणूका निघत आहेत. गणपतीला निरोप देताना अनेकांचे मन सुन्न झाल्याचे दिसत आहे. ठाणे शहरातील विसर्जन घटावर दुपार पासून गणेश भक्तांची गर्दी झाल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात कृत्रिम तलाव आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पेक्षा दीड पट जास्तीची विसर्जन व्यवस्था केली आहे. यंदा २३ कृत्रिम तलाव, ७७ टाकी विसर्जन व्यवस्था, १५ फिरती विसर्जन केंद्र, ९ खाडी घाट विसर्जन व्यवस्था आणि १० मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण १३४ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात दीड दिवसाचे ६ गणपती सार्वजनिक मंडळात तर, उर्वरित ४३ हजार ६७८ घरगुती गणपती होते. यातील ठाणे परिमंडळ १ आणि ५ या क्षेत्रात ०३ सार्वजनिक तर, १५ हजार ८८८ घरगुती गणपतींचा समावेश होता. ठाणे जिल्ह्यातील सर्व परिमंडळाचे मिळून एकूण ४३ हजार ६८४ गणपतींचे आज, विसर्जन होणार आहे. यासाठी विसर्जन घाटावर सकाळपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, पालिकेचे कर्मचारी देखील बंदोबस्तासाठी तैनात केले असून निर्माल्य संकलित करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
परिमंडळ निहाय्य दीड दिवसांच्या गणपतींची विसर्जन आकडेवारी
परिमंडळ ——- सार्वजनिक ———- घरगुती
परिमंडळ १ (ठाणे) — ०० — ४१३५
परिमंडळ २ (भिवंडी) — ०१ — ४७९०
परिमंडळ ३ (कल्याण) — ०१ — १३०२०
परिमंडळ ४ (उल्हासनगर) — ०१ — ९९८०
परिमंडळ ५ (वागळे इस्टेट) — ०३ —- ११७५३
एकूण —- ०६ — ४३,६७८