तुमचे मागील महिन्याचे वीज देयक तुम्ही भरणा केले आहे पण ते आमच्याकडे वर्ग झाले नाही. आता तुम्ही मला मोबाईलवर १० रुपये गुगल पे द्वारे पाठवा. तात्काळ तुमचे देयक पुनर्स्थापित करुन तुमच्या घराचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. ही प्रक्रिया पार पाडली नाही तर आज रात्री साडे नऊ वाजता तुमच्या घराचा वीज पुरवठा बंद होईल, अशी माहिती कल्याण मधील रामबागेतील एका शिक्षिकेला रात्रीच्या वेळेत एका तोतया महावितरण कर्मचाऱ्याने दिली. आपण खरच देयक भरणा केले नसेल असा विचार करुन शिक्षिकेने गुगल पेव्दारे भामट्याला १० रुपये पाठविताच शिक्षिकेच्या बँक खात्यामधून दोन दिवसांमध्ये एक लाख ९७ हजार रुपये भामट्याने स्वताच्या खात्यात वर्ग करुन घेतले. आणि शिक्षिकेची फसवणूक केली.अनिता अरुण जाधव (५४, रा. यशोकुंज सोसायटी, रामबाग, गल्ली क्र. चार, कल्याण) असे फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. जुलै मध्ये हा प्रकार घडला आहे.

हेही वाचा >>> ‘सोनोग्राफी’चा चुकीचा अहवाल देणाऱ्या डॉक्टरविरुध्द गुन्हा

पोलिसांनी सांगितले, अनिता जाधव यांना १७ जुलै रोजी रात्री नऊ वाजता एक लघुसंदेश आला. त्यामध्ये तुमचे वीजेचे देयक भरणा केले आहे पण ते आमच्याकडे वर्ग झाले नाही. ते वर्ग करण्याची प्रक्रिया करावी लागेल. ही प्रक्रिया केली नाही तर तुमच्या घराचा वीज पुरवठा आज रात्री साडे नऊ वाजता खंडित करण्यात येईल. त्या संदेशाखाली एक मोबाईल क्रमांक दिला होता. रात्रीच्या वेळेत वीज खंडित होईल या भीतीने अनिता यांनी तात्काळ त्या मोबाईलवर संपर्क साधला. त्याने हिंदी भाषेतून बोलत मी एमएसईबी कार्यालयातून बोलत आहे. तुम्ही शेवटच्या महिन्याचे वीज देयक भरणा केले आहे. परंतु ते आमच्याकडे अद्याप वर्ग झालेले नाही. त्यामुळे ते देयक तुम्ही आता भरणा केले नाही तर तुमच्या घराचा वीज पुरवठा खंडित होईल, असे एम. एस. ई. बी. मधून बोलणाऱ्या तोतया कर्मचाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>>डोंबिवली : चिन्ह गोठविण्यावरुन मनसेचा शिंदेंना चिमटा तर ठाकरेंचा कैवार

भामट्याने अनिता यांना त्याच्या मोबाईलवर १० रुपये गुगल पे व्दारे पाठविण्यास सांगितले. महावितरणचा कर्मचारी बोलतो म्हणून अनिता यांनी दहा रुपये पाठविले. त्याला मागणी प्रमाणे स्टेट बँकेचे एटीएम कार्ड, युपीआय क्रमांक कळविला. ही माहिती भामट्याला मिळताच अनिता यांच्या स्टेट बँक खात्या मधून ४८ हजार रुपये, ४९ हजार रुपये भामट्याच्या खात्यामध्ये काही क्षणात वर्ग झाले. बँक खात्यामधून रक्कम वर्ग झाल्याचे कळताच अनित यांनी भामट्याचा मोबाईल बंद करुन तात्काळ बँकेला खात्यामधून रक्कम वळती करू नये असे सुचविले. त्यानंतरही दुसऱ्या दिवशी अनित यांच्या बँक खात्या मधून सकाळी सव्वा दहा वाजता ५० हजार, २५ हजार, २४ हजार रुपये भामट्याच्या खात्यात वर्ग झाले. अनिता यांच्या खात्यामधून एकूण एक लाख ९७ हजार २३ रुपये वर्ग झाले.

हेही वाचा >>> ठाणे : शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला उद्यापासून ठाण्यातून सुरुवात ; यात्रेननिमित्ताने जाहीर मेळाव्याचे आयोजन

महावितरणचा कर्मचारी सांगून आपली भामट्याने फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यावर अनिता जाधव यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करुन घेतला आहे.महावितरणने वेळोवेळी महावितरण मधून बोलतो आपले वीज देयक भरा असे मोबाईल कोणी केले तर तात्काळ महावितरणशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तरीही ग्राहक संपर्क साधत नसल्याने ते फसवणुकीला बळी पडतात, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षापासून अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.