शहापूर : ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागात देखील गेले काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. शहापुर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बेडेघर कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दुंदा मल्हारी निमसे (५६ ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली होती.
शहापुर तालुक्यातील अल्याणी गावात दुंदा मल्हारी निमसे राहत होते. त्यांनी शेतीउपयोगी साहित्य आणि जाळणासाठीची सुकलेली लाकडे ठेवण्यासाठी त्यांच्या घराशेजारी बेडेघर बांधले होते. रविवारी पहाटे सोसाट्याचा वारा आणि संततधार पाऊस सुरु होता. निमसे हे त्यांच्या राहत्या घराजवळ असलेल्या बेडेघरात झोपले होते. त्यादरम्यान, सोसाट्याचा वाऱ्यामुळे निमसे यांच्या अंगावर बेडेघर कोसळले. या घटनेत निमसे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, शहापूरच्या महसूल विभागातील कर्मचारी आणि किन्हवली पोलीस घटनास्थळी पोहोचले.
वडाचे झाड पडल्याने घराचे नुकसान
शहापुर तालुक्यातील अल्याणी गावात दुंदा मल्हारी निमसे यांचा बेडेघर कोसळून मृत्यू झाला असतानाच, काळे पाडा येथे योगेश कृष्णा भोईर यांच्या तबेल्या जवळ बांधलेल्या चाळीवर रस्त्यालगत असलेले वडाचे झाड पडल्याने त्यांच्या घराचे पत्रे फुटून नुकसान झाले आहे. तसेच हे झाड मुख्य रस्त्यावरही पडल्याने ते काढण्याचे काम सुरु आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही.