आसामला पर्यटनासाठी जायाचे असेल तर विमानाची तिकिटे काढून देतो. यासाठी एक लाख रूपये द्या. असे सांगून व्यापाऱ्याकडून एक लाख रूपये वसूल करून नंतर व्यापाऱ्याला तिकिटे नाहीच, त्याची एक लाख रूपयांची रक्कम परत न करणाऱ्या टूर एजंट विरुध्द व्यापाऱ्याने कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा प्रकार घडला आहे. दिनेश जगजीवन शहा (७०, रा. नव वृंदावन सोसायटी, गोडबोले रुग्णालयासमोर, कल्याण पश्चिम) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. राजेश पटेल असे टूर एजंटचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, दिनेश शहा यांना कुटुंबासह आसाम येथे पर्यटनासाठी जायाचे होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पर्यटनासाठी विमान प्रवास, हाॅटेल नोंदणीची तयारी सुरू केली होती. दिनेश यांचा कल्याणमधील मित्र किरीट पटेल यांनी दिनेश यांना पर्यटन प्रवासाची तिकिटे व इतर साहाय्यासाठी कल्याणमधील पर्यटन मध्यस्थ पूर्णिमा ठक्कर आणि त्यांचा मित्र राजेश पटेल (रा. कांदिवली) यांना सांगितले.
राजेश यांनी दिनेश यांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवून आसाम प्रवासाची तिकिटे काढण्यासाठी एक लाख रूपये दिनेश यांच्याकडे मागितले. दिनेश यांनी आपल्या बँक खात्यामधून एक लाखाची रक्कम राजेश पटेल यांच्या बँक खात्यावर वळती केली. राजेशने दिनेश यांचे मित्र किरीट यांच्या मोबाईलवर तिकिटांचा नोंदणी क्रमांक पाठविला. नोंदणी नंतर प्रत्यक्ष तिकिटे हातात असणे आवश्यक होते. त्यामुळे दिनेश, किरीट यांनी राजेश पटेल यांना मोबाईलवर गेल्या सहा महिन्यापासून सतत संपर्क केले. त्याला राजेशने कोणताही प्रतिसाद दिला नाही. राजेशचा पत्ता तक्रारदार यांना माहिती नसल्याने त्यांचा शोध घेणे शक्य नाही.
राजेशने आपली फसवणूक केली आहे. त्याने आपल्या एक लाख रकमेचा अपहार केला आहे. हे लक्षात आल्याने दिनेश शहा यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात राजेश पटेल विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून फरार राजेशचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, गेल्या पंधरा दिवसापूर्वी कल्याण, डोंबिवलीतील काही प्रवाशांचे गट उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. या रहिवाशांच्या तेथील निवासाच्या सोयी अडगळीच्या हाॅटेल, खेडे, दुर्गम भागात केल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका ७० जणांच्या गटाने तर टूर पर्यटका विरुध्द उत्तराखंडमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात उत्तराखंड पर्यटन विभाग, भारतीय पर्यटन विभाग यांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला असे या पर्यटन गटात सहभागी असलेले डोंबिवलीतील एका पर्यटक संदीप प्रभुदेसाई यांनी सांगितले.
