ठाणे : घोडबंदर भागातील कासारवडवली येथील उड्डाणपूलावरील एक मार्गिका मंगळवारी दुपारनंतर वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. उड्डाणपूलावरून वाहतुक सुरु झाल्याने कासारवडवली, आनंदनगर भागात होणाऱ्या वाहतुक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांनी दुसरी मार्गिका देखील खुली केली जाणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला.
मुंबई, गुजरात, नाशिक आणि जेएनपीटी बंदरातून वाहतूक करणारी अवजड वाहने घोडबंदर मार्गे वाहतूक करतात. याशिवाय, घोडबंदर भागात राहणाऱ्या नागरिकांची वाहनेही याच मार्गे वाहतूक करतात. त्यामुळे घोडबंदर मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर कासारवडवली आणि ओवळा भागात उड्डाणपूलाच्या निर्मितीचे काम सुरू होते. त्यापैकी ओवळा उड्डाण पुलाचे काम पुर्ण होताच तो काही दिवसांपुर्वी वाहतूकीसाठी खुला केला. मात्र, कासारवडवली पुलाचे काम पुर्ण झालेले नव्हते. ३० जून पर्यंत पुलाचे काम पुर्ण करण्याच्या सुचना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंघित विभागाला केल्या होत्या.
गेल्या काही महिन्यांपासून संथगतीने सुरू असलेल्या या पुलाचे काम नुकतेच पुर्ण झाले असून यामुळे मंगळवारी या पुलाचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. येथील घोडबंदर ते ठाणे या दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात येणार आहे. दोन ते तीन महिन्यांत ही मार्गिका खुली केली जाणार असल्याचा दावा सरनाईक यांनी केला. उड्डाणपूलावरील वाहतुक सुरु झाल्याने ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच कासारवडवली ते आनंदनगर येथील वाहतुक कोंडीतून देखील नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे.