लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुधवारी रात्री दिवा शहरातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सुरू होते. या अंतर्गत धर्मवीर नगर येथे सभा सुरू असतानाच या परिसरात शॉर्ट सर्किट होऊन रामजीयावन विश्वकर्मा (५५) यांचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडूनही याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याने विविध चर्चांना उधान आले आहे. भाजपने याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी रमाकांत मढवी हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास सुरू असल्याची माहिती उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात दिवा शहर येते. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून दिवा शहर ओळखले जाते. या भागातून आठ नगरसेवक निवडून येतात. दिवा शहरातील विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शहरातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. बुधवारी रात्री आगासन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार श्रीकांत शिंदे हे भाषण करत असताना सभा स्थानापासून काही मीटर अंतरावर शॉर्ट सर्किट झाला. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी रामजीयावन विश्वकर्मा यांना घटनास्थळावरून बाहेर काढले. त्यावेळी त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना डायघर भागातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

आणखी वाचा-खा. श्रीकांत शिंदे यांना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी, ‘कल्याण लोकसभेसाठी भाजप म्हणेल तोच उमेदवार’

ही घटना मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असतानाही शिळ -डायघर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आल्याने चर्चांना उधान आले आहे. ही घटना कशी घडली. याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारास निष्काळजीपणा करणारे आयोजक शिंदे गटाचे पदाधिकारी रमाकांत मढवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपचे दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One person died due to lightning near chief minister eknath shindes meeting at diva mrj
First published on: 08-06-2023 at 16:34 IST