कल्याण-डोंबिवलीत फक्त ४७ टक्के मतदान; आज मतमोजणी

राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिवसेनेने परस्परांविरोधात दंड थोपटून अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदारांनी मात्र फारसा उत्साह दाखवला नाही. रविवारी या दोन्ही शहरांतील केवळ ४७ टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. कमी मतदान झाल्याने त्याचा फायदा कोणाला होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर महापालिकेसाठी मात्र तब्बल ७० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. आज, सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून दोन्ही ठिकाणच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला तेवढय़ाच आक्रमकपणे प्रत्युत्तर देत ‘वाघाच्या जबडय़ात हात घालणारी आमची जातकुळी असल्याचे’ ठणकावले होते. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून पोलीस दलाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अशा अनेक आरोप-प्रत्यारोपांनी दोन्ही महापालिका निवडणुकांमध्ये रंगत आली होती. मात्र, कल्याण-डोंबिवलीतील मतदारांनी या सगळ्याची दखल न घेता घरी बसणेच पसंत केले. राजकीय पक्षांनी योग्य उमेदवार न दिल्याने काहींनी मतदान न करण्याचा तर काहींनी ‘यापैकी कोणीही नाही’ (नोटा) या पर्यायाचा वापर केला आहे. मात्र गेल्या निवडणुकीतही कल्याण डोंबिवलीत ४६.४९ टक्के मतदान झाले होते. दरम्यान २७ गावांमध्ये शांततेत मतदान झाले. काटई गावात शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांत शनिवारी हाणामारी झाली. या पाश्र्वभूमीवर या परिसरात तणावाचे वातावरण होते. मात्र, किरकोळ अपवाद वगळता काटईसह २७ गावांतील १७ प्रभागांत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. भाल गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

हाणामारी आणि पोलिसांचा लाठीमार

कल्याण-डोंबिवलीत हाणामारीच्या व बोगस मतदार ओळखपत्राच्या घटना घडल्या. पाथर्ली प्रभागात मनसे उमेदवाराच्या पतीने पालन या व्यक्तीवर हल्ला केल्याने तो जखमी झाला. तर महापौर कल्याणी पाटील यांच्या प्रभागात मतदारांना मतदानासाठी जबरदस्ती करण्यात येत असल्याचा आरोप भाजपच्या उमेदवार सुमन निकम यांनी केला. कल्याणमध्ये खडकपाडा प्रभागात बोगस मतदान करणाऱ्या दोन मतदारांना अटक करण्यात आली. तसेच रामनगर, तिसगाव प्रभागांमध्ये बोगस मतदानाचे प्रकार झाले. कल्याणमधील फ्लॉवर व्हॅली प्रभागात बोगस मतदान ओळखपत्र जवळ बाळगल्याबद्दल चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या ठिकाणी मनसे व भाजपच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला.