बनावट देय पावत्या तयार करून इनपुट क्रडिट टॅक्सचा (आयटीसी) १९ कोटी रुपयांचा परतावा मिळवून गैरव्यवहार केल्याप्रकरणी ओप्पो मोबाईल कंपनीचा वित्त व लेखा विभागाचा व्यवस्थापक महेंद्र रावत याला केंद्रीय वस्तू सेवा कर विभागाच्या भिवंडी पथकाने अटक केली आहे. त्याला ३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्त सुमीत कुमार यांनी दिली.

हेही वाचा >>> महेश आहेर यांची ठाणे पोलिसांकडून चौकशी

ओप्पो या चिनी मोबाईल कंपनीचे भिवंडीत ओप्पो मोबाईल इंडिया प्रा. लिमीटेड कंपनी नावाने कार्यालय आहे. ही कंपनी बनावट पावत्या तयार करुन आयटीसी परतावा मिळवित असल्याची माहीत केंद्रीय वस्तू सेवा कर विभागाच्या भिवंडी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने ओप्पो कंपनीच्या पुरवठादार कंपनीची पाहणी केली असता, त्याठिकाणी कोणतीही कंपनी आढळून आली नाही.

हेही वाचा >>> स्वागत यात्रेत कल्याण डोंबिवली पालिकेचा स्वच्छतेचा जागर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पथकाने ओप्पो कंपनीच्या ई-वे देयकाच्या पावत्यांची तपासणी केली असता त्या बनावट असल्याचे आढळून आले. तसेच कंपनीने वाहन मालक आणि चालकांची चौकशी केली असता त्यांनीही कोणत्याही वस्तूंची ने-आण केली नसल्याची कबूली दिली. त्यानंतर पथकाने रावत याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. १९ कोटी रुपयांची आयटीसी परतावा मिळविल्या प्रकरणात त्याला बुधवारी पथकाने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, ३ एप्रिलपर्यंत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. याप्रकरणात तपास सुरूच राहील अशी माहिती आयुक्त सुमीत कुमार यांनी दिली.