डोंबिवली पॅसेंजर्स असोसिएशन
tv04डोंबिवली पॅसेंजर असोसिएशनच्या वतीने माजी खासदार रामभाऊ म्हाळगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ६ मार्च हा प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. रामभाऊ यांच्या सहकार्याने असोसिएशनने प्रवाशांच्या अनेक समस्या चर्चा व पाठपुरावा करून मार्गी लावल्या आहेत. आणीबाणीच्या काळात असोसिएशनला रामभाऊंची मोलाची साथ लाभली. आंदोलन करण्यापेक्षा चर्चात्मक मार्गाने सातत्याने पाठपुरावा करून समस्या सोडविणे हे असोसिएशनचे वैशिष्टय़ असून प्रवासी दिनानिमित्ताने असोसिएशनच्या कामकाजाचा घेतलेला आढावा..
अपुरी जागा आणि घरांचे वाढते दर यामुळे मुंबईकर सत्तरच्या दशकात डोंबिवलीत स्थलांतरित होऊ लागले.  परगावाहून आलेल्या चाकरमान्यांनीही डोंबिवलीतच आपले संसार थाटले. डोंबिवलीचा विस्तार वाढू लागला. नोकरीनिमित्त चाकरमानी लोकलने प्रवास करूलागले. प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली. त्याबरोबरच त्यांच्या समस्येतही वाढ होऊ लागली. त्यावेळी दादा पांडे, सरवटे या तरुणांनी पुढाकार घेऊन काही सुजाण नागरिकांसोबत फेडरेशन ऑफ बॉम्बे सर्बबन पॅसेंजर असोसिएशनअंतर्गत १ ऑगस्ट १९६० रोजी डोंबिवली पॅसेंजर असोसिएशनची स्थापना केली. तत्कालीन नगराध्यक्ष बापूसाहेब जुवेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. १९७५ मध्ये आणीबाणी आली आणि संस्थेच्या कामास खीळ बसली.
त्यानंतर चार वर्षांनंतर तत्कालीन खासदार रामभाऊ म्हाळगी हे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडणारे दूत म्हणूनच संस्थेला लाभले. त्यांच्याच प्रयत्नांनी १९७९-८० मध्ये पुन्हा या संस्थेच्या कामास चालना मिळाली. केंद्रातही भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आणि जनतेला आपले सरकार आल्यासारखे वाटू लागले. प्रवाशीही पुढे येऊन आपल्या समस्या असोसिएशनच्या सदस्यांकडे मांडू लागले. रेल्वे बोर्ड रेल्वे मंत्र्यांना निधी नसल्याची कारणे देऊ लागले. तत्कालीन रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी डॉ. परांजपे यांची एक समिती नेमून एकंदर परिस्थितीचा आढावा घ्या यचा प्रयत्न केला. डॉ. परांजपे यांच्या रिपोर्टमध्ये फंड नाही. भाडेवाढ केली तरच रेल्वे तग धरू शकेल असा निष्कर्ष काढून १०० टक्के भाडे वाढ सुचविली होती. खासदार म्हाळगी यांनी फेडरेशन ऑफ बॉम्बे सर्बबन असोसिएशन या महासंघाचे पुनरुज्जीवन करून त्यावेळचे आमदार रामभाऊ कापसे, रामभाऊ नाईक आणि जयवंतीबेन मेहता यांचे सहकार्य घेतले. पुढे हे काम चालविण्याची जबाबदारी त्यांनी डोंबिवलीच्या भालचंद्र लोहोकरे यांच्यावर सोपवली. या महासंघाने कल्याणचे वकील भाऊसाहेब सबनीस यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासगटाची स्थापना करून अभ्यासगटाचा अहवाल लोकसभेत सादर केला. परिणामी जाहीर झालेली भाडेवाढ ५० टक्क्याने कमी झाली. याच काळात रामभाऊ म्हाळगी यांचा प्रवासी संघाशी निकटचा संबंध निर्माण झाला. त्यांनी सर्व प्रवासी संघटनांनी केलेल्या कामाची माहिती करून घेतली.
 प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना खूप प्रयत्न करते, पण रेल्वेकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही हे रामभाऊंच्या लक्षात येताच त्यावर तोडगा म्हणून त्यांनी एक विनंती अर्ज तयार केला. त्यावर लाखो प्रवाशांच्या स्वाक्षऱ्या घेऊन तो अर्ज लोकसभेत सादर केला. दुर्दैवाने ती लोकसभा आपला कार्यकाल पूर्ण होण्याआधीच बरखास्त झाली. १९८० मध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणुका होऊन जनता पार्टीचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी खासदार रामभाऊ हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून आले. त्यांनी अत्यंत हुशारीने आपला विनंती अर्ज परत लोकसभेत सादर केला आणि तो त्या लोकसभेचा पहिला विनंती अर्ज ठरला. पुढे लोकसभेच्या पिटीशन इन्क्वायरी समितीने त्या अर्जाची पूर्ण चौकशी केली.
प्रवासी संघटनांनी आपला एक अभ्यास अहवाल सादर करून मुंबई उपनगरीय रेल्वे सुधारण्याबाबत १६ सूचना मांडल्या होत्या. त्यात  दादर टर्मिनल करावे, सर्व उपनगरीय गाडय़ा या १२ डब्यांच्या असाव्यात, गाडय़ांची संख्या वाढवावी, लोकल गाडय़ांची दुरुस्ती लवकर व्हावी म्हणून कळवा कारशेड बांधावे, डोंबिवली टर्मिनल व्हावे आदी विविध सूचना होत्या. त्या पुढे यथावकाश पूर्ण झाल्या. प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यात डोंबिवली पॅसेंजर्स असोसिएशन अग्रस्थानी होते. या मागण्यांसाठी दिल्लीला जाऊन विनंती अर्ज चौकशी समितीकडे मांडणे. समितीत तत्कालीन आमदार राम कापसे, राम नाईक, अ‍ॅड. भाऊसाहेब सबनीस, श्रीकृष्ण शिदोरे, भावे बंधू, दादा पांडे, भालचंद्र लोहोकरे या प्रतिनिधींनी म्हाळगी यांच्या नेतृत्वाखाली साक्ष दिली होती. प्रवासी संघाचे मुख्य काम
म्हणजे सामान्य प्रवासी व रेल्वे अधिकारी यांच्यामधील दुवा म्हणून काम करणे. रेल्वेची यंत्रणा अतिशय गुंतागुंतीची आहे. त्यांच्याही अनेक अडचणी असतात, त्या समजून घेऊन आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडाव्या लागत.

तीन दशकांनंतर डोंबिवली टर्मिनल
याविषयी डोंबिवली पॅसेंजर असोसिएशनचे सचिव भालचंद्र लोहोकरे म्हणाले, रेल्वेच्या कामांचा असा अनुभव आहे की ‘रेल्वे मे देर है अंधेर नही.’ मात्र त्यासाठी जबरदस्त संयम आणि सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. डोंबिवली टर्मिनल मिळविण्यासाठी असोसिएशनला २८ वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागले. याकाळात शहरातील राजकीय पक्ष, महापालिका, नागरिक, पत्रकार यांचे सहकार्य लाभले. नकुल पाटील, राजा कुलकर्णी, रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे व नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे. नगराला डोंबिवली टर्मिनलची गरज होती आणि त्यासाठी सर्वानी मिळून लढा दिला. ६ मार्च १९८२ ला रामभाऊ म्हाळगी यांचे निधन झाले. त्यांचा प्रथम स्मृतीदिनी असोसिएशनच्या वतीने प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला. गेली ३२ वर्षे हा दिन असोसिएनच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. प्रवाशांना एकत्र आणून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याचा पाठपुरावा करण्याचे काम असोसिएशन करते. समस्या सोडविण्यासाठी आंदोलनाला महत्त्व देण्यापेक्षा चर्चा व पाठपुराव्याला असोसिएशन महत्त्व देत आले आहे. आंदोलन चालू करणे सोप आहे, मात्र त्यावर कोणाचा कंट्रोल राहत नाही. काही समाजविघातक लोक सार्वजनिक मालमत्तेचे यावेळी नुकसान करतात यास असोसिएशन सहमत नसल्याने चर्चा व पाठपुराव्यातूनही प्रश्न सुटतात असे लोहोकरे सांगतात.
शर्मिला वाळुंज

पाठपुराव्यानंतर मार्गी लागलेले प्रश्न
* १९८० च्या दरम्यान लोकसभेमध्ये पिटीशन दाखल करून स्व. रामभाऊ म्हाळगीच्या सहकार्याने प्रवासी भाडे वाढ ५० टक्क्य़ांनी कमी करून घेतले. अन्य  ८० टक्के मागण्यांना तत्त्वत: मंजुरी मिळाली व नंतर त्या मागण्यांची कालांतराने पूर्तता झाली.
* तीस वर्षांच्या पाठपुराव्यानंतर डोंबिवली लोकल सुरू झाली.
* स्कायवाक स्थित एलिवेटेड तिकीट बुकिंग कार्यालय  
* डोंबिवली स्थानकाच्या होम फलाटावर दोन्ही बाजूने चढण्या-उतरण्याची सोय उपलब्ध   
* दिवा वसई किंवा पनवेल वसई उपनगरी विभाग जाहीर करून गाडय़ांची संख्या वाढविणे.
* महिला प्रवाशांच्या अडी-अडचणींना वाचा फोडण्यासाठी भारतातील पहिली महिला प्रवासी परिषद भरविण्यात आली.
संघटनेच्या मागण्या
* दिवा स्थानकात सर्व मेल एक्स्प्रेस ट्रेन थांबवा
* कोपर स्टेशनची लांबी वाढवून तेथे मेल एक्स्प्रेस ट्रेन थांबाव्यात जेणेकरून खालच्या कोपर स्टेशनवरून प्रवासी मुंबई किंवा कर्जत कसाराकडे जाऊ शकतील.
* कल्याण-वाशी ट्रेन सुरू करणे
* ठाणे- कर्जत – कसारा शटल फेऱ्या वाढवाव्यात.
* दिवी – वसई, पनवेल – वसई ट्रेनची संख्या वाढवावी.
* मोठागाव माणकोली उड्डाण पूल लवकर सुरू करावा. जेणेकरून डोंबिवली – ठाणे प्रवास अधिक सुलभ व्हावा.  
* पनवेल कर्जत लोकल लवकर सुरू करावी.