ठाणे : ठाणे आणि नवी मुंबई शहरातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या विटावा मार्गावरील मध्य रेल्वेच्या पुलाला अवजड वाहने धडकून अपघात होऊ नये यासाठी या पुलाआधीच उंची रोधक बसविण्यात आलेले आहेत. या उंचीरोधकाला गुरूवारी दुपारी एक अवजड वाहनाने धडकल्याने ते तुटल्याने ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. या अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू केल्याने या मार्गावरही कोंडी झाली. पाऊण तासानंतर ट्रकला बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
ठाणे आणि नवी मुंबई शहरातील वाहतूकीसाठी कळवा-विटावा हा मार्ग महत्वाचा मानला जातो. या मार्गावर पथकर नाही. ऐरोली मार्गावर पथकर घेण्यात येत असल्यामुळे अवजड वाहने कळवा -विटावा मार्गेच वाहतूक करतात. परंतु या मार्गाला विटावा परिसरात मध्य रेल्वेची मार्गिका भेदून जाते. यासाठी रस्त्यावर रेल्वेने पुलाची उभारणी केली आहे. या पुलाखालून वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र, या पुलाखालून मोठी अवजड वाहने जाऊ शकत नाहीत. या वाहनांची रात्रीच्या वेळेत पुलाला धडक बसून अपघात होण्याची भीती व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईहून ठाण्याच्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर विटावा येथे तर, ठाण्याहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कळवा येथे उंचीरोधक बसविण्यात आलेले आहेत. असे असले तरी या उंची रोधकाला अवजड वाहने येऊन धडकत असल्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून घडत असून असाच प्रकार गुरूवारी दुपारी घडला.
नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जात असलेले मोठे अवजड वाहन विटावा येथील उंचीरोधकाला धडकले आणि यामुळे उंची रोधक तुटून अर्धवट अवस्थते लटकत होते. या अपघातानंतर या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागून कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अवजड वाहन आणि तुटलेले उंचीरोधक बाजूला करण्याचे काम सुरू केले. त्याचबरोबर ठाण्याहून नवीमुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू केली. या साठी दोन्ही बाजूची वाहतूक काहीकाळ रोखून सोडण्यात येत होती. त्यामुळे कळवा आणि नवी मुंबई परिसरात पाऊण तास वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अवजड वाहन आणि तुटलेले उंचीरोधक बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक काही वेळानंतर सुरळीत झाली. ही कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकीनऊ आले होते.