ठाणे : मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या रवी वर्मा याने गुरुवारी वकिलांमार्फत जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला.
कळवा भागात राहणारा रवी वर्मा हा एका कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता. संबंधित कंपनी मुंबई येथील नौदलाच्या गोदीला सेवा पुरवत होती. वर्मा हा गोदीमध्ये कामानिमित्ताने जात होता. त्याच्याकडे गोदीचे नकाशे आणि छायाचित्र होती. हे छायाचित्र आणि नकाशे त्याने एका तरुणीला पुरवल्याचा आरोप आहे.
सामजमाध्यमावर ‘मुधाजाला’च्या आधारे (हनीट्रॅप) त्याला पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. त्याला दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. सध्या वर्मा हा न्यायालयीन कोठडीत आहे. गुरुवारी त्याने वकील राजहंस गिरासे यांच्या माध्यमातून ठाणे न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे जामीनासाठी अर्ज सादर केला. या अर्जावर तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलांचे म्हणणे सादर करण्यास न्यायाधिशांनी सांगितले आहे.