पालघर – जिल्ह्यातील वाडा तालुक्यात १० वर्षीय आदिवासी मुलीला घरकामासाठी सक्तीने मजुरी करायला लावल्याप्रकरणी भायंदर येथील एका महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुलगी कातकरी समाजातील असून वडिलांच्या निधनानंतर ती आजी-आजोबांसोबत राहत होती. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात आरोपी महिलेने मुलीला सोबत नेले होते. “त्या महिलेने तिच्याकडून कपडे-भांडी धुणे, मजले पुसणे, मासे सुकवणे व गोळा करणे अशी घरातील सर्व कामे करून घेतली. तसेच तिने तिच्यावर शिवीगाळ करून मारहाणही केली,” अशी तक्रार त्या मुलीच्या आजीने पोलिसांना केली होती. जून २०२५ मध्ये मुलगी घरी परतल्यानंतरही तिच्यावरील अत्याचार काही थांबला नव्हता. आरोपी महिलेने ५ ते ६ हजार रुपयांचा आगाऊ पैसे पाठवले आणि बुधवारी त्या मुलीला पुन्हा आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न केला असता, मुलीच्या आजीने विरोध केला. त्यावेळी आरोपी महिलेने मुलीच्या आजीला तिने आधीच दिलेल्या पैशांच्या कारणावरून पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यानंतर, आजीने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन त्या महिले विरोधात तक्रार नोंदवली.

या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितातील सक्तीची मजुरी, मारहाण आणि गुन्हेगारी धमकी यांसंबंधी कलमांखाली तसेच बंधन मजुरी प्रणाली कायदा, बालकामगार, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, अल्पवयीन मुलीची सक्तीच्या मजुरीतून सुटका करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.