ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सुनील जैन आणि संजय पुनामिया यांच्यासह पाच जणांविरोधात सुमारे पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तर, जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत (सीबीआय) सुरू होता. या दोन्ही गुन्ह्याचा सीबीआयने तपास करून परमबीर यांना क्लिनचीट दिली असून तसा अहवाल त्यांनी न्यायालयात सादर केला आहे.
माजी निवृत्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी ठाणे आणि त्यानंतर मुंबई पोलिस दलात आयुक्त पदावर काम केले. मात्र, निवृत्तीनंतर त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. २०१८ मध्ये परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी यूएलसी घोटाळ्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अगरवाल यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरोधातील मोक्का कायद्यांतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी परमबीर सिंह, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन उपायुक्त पराग मणेरे, सुनील जैन, संजय पुनामिया, मनोज घोटेकर यांनी ४ कोटी ६८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अगरवाल यांचे पुतणे शरद यांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुनील आणि संजय यांना एका खंडणीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनीही अटक केली होती. त्याचबरोबर ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह विविध यंत्रणांना पाठविले होते. त्यापाठोपाठ त्यांनी परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा कल्याण बाजारपेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणामुळे परमबीर सिंह यांच्याह अनेक पोलिस अधिकारी अडचणीत आले होते. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आला होता. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणाचा तपास केला असता, त्यामध्ये काहीएक तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी दोन्ही गुन्ह्यात परमबीर सिंग यांनी क्लिनचीट दिली असून तसा अहवाल त्यांनी न्यायालयात सादर केला आहे.