पास्कल रॉक लोपीस इतिहास अभ्यासक, नाणे संशोधक
नाणेशास्त्राचा अभ्यास करून त्यावर संशोधन करणारे पास्कल रॉक लोपीस हे गेल्या कित्येक वर्षांपासून नाण्यांचे संग्राहक आहेत. लोपीस यांनी मुंबई विद्यापीठातून निमिस्मॅटिक आणि अर्किओर्लाजीमध्ये पदवी घेतली आहे. तसेच भारतीय, पोर्तुगीज, मराठा नाण्यांवर संशोधन करत त्यांनी २००० हून जास्त नाणी ५०० हुूा जास्त पुस्तकांचा संग्रह केला आहे.
पुस्तके म्हणजे माझ्यासाठी मित्र, मार्गदर्शक आहेत. मी शाळेत आणि त्यानंतर इंजिनीरिंग कॉलेजमध्ये बहुतेक करून इंग्रजी पुस्तकेच वाचली. कॉलेजमध्ये असताना लायब्ररीत युरो करन्सीवर बरेच लेख वाचले. त्यानंतर याच विषयावर ‘कॉम्पुटर सोसायटी ऑफ इंडिया’मध्ये माझा लेख सर्वप्रथम प्रकाशित झाला. त्या वेळी कॉलेजमधील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी माझे खूप कौतुक केले. त्यानंतरच खऱ्या अर्थाने मला अवांतर वाचन करायची प्रेरणा मिळाल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. घरी वडिीलांनी ‘रीडर्स डायजेस्ट’ हे इंग्रजी मासिक वाचायची सवय लावली. शिवाय शाळेपासूनच मला जुनी नाणी जमवण्याचा छंद होता. त्याच दरम्यान या मासिकाच्या साहाय्यक उपसंपादक शानू भिजलानी यांच्या नाण्यासंदर्भातील लेखाने मला खूप प्रभावित केले. त्यातूनच ‘बिग मनी फॉर स्मॉल चेंज’ या विषायावर लिहता येऊ शकते, याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर मंगलोरचे एम मुकुंद प्रभू यांनी परमेश्वरी लाल गुप्ता यांनी लिहिलेले ‘कॉइन्स’ हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला. या पुस्तकांमुळे मला या क्षेत्राकडे बघण्याचा एक अभ्यासू दृष्टिकोन मिळाला.
कॉलेज संपल्यानंतर शिव खेरा यांचे ‘यू कॅन विन’ या पुस्तकाचा माझ्या आयुष्यावर खूप खोलवर प्रभाव पडला. ‘यश म्हणजे अपयशाचा अभाव असे नाही, यश म्हणजे अंतिम लक्ष्य साध्य करणे’ हे या पुस्तकाने मला शिकवले. तसेच प्रामाणिकपणा, स्वत:चा स्वाभिमान जपणे, जगण्याकरिता स्वत:च्या तत्त्वांशी तडजोड न करणे आणि नेहमी कृतज्ञ राहण्याची शिकवण आणि देवासमोर मान वर करण्याचा आत्मविश्वास या पुस्तकाने दिला.
थायलंडमध्ये असताना बायबलचे सखोल वाचन केले. डॅन ब्राऊन यांचे ‘दा विंची कोड’ हे फिक्शन पुस्तक वाचले. या पुस्तकातील लिहिण्याची शैली खूप आवडली. पुढे या विषयाशी निगडित अनेक कादंबऱ्या वाचल्या. ‘कॉन्स्टेंन्टाइन्स सॉर्डजेम्स’ हे कॉररेल यांचे पुस्तक, ‘गासपेल ऑफ जुदास’ हे सायमन मेवर यांचे पुस्तक, ‘जिज्स लिव्हड इन इंडिया’ हे होलगार कर्स्टन यांचे पुस्तक वाचले. त्यासोबतच शिवाजी सावंत यांचे ‘मृत्युंजय’, न. स. इनामदार यांची ‘राऊ ’, जयराज साळगावकर यांचे ‘बाजीराव’, रणजित देसाई यांची ‘स्वामी’ या कादंबऱ्यादेखील खूप आवडल्या. मला बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी, अर्थकारण यावरदेखील पुस्तके वाचण्याची आवड आहे. याशिवाय वसईचा किल्ला व इतिहास यावर १८७६ पासून अनेक लेखकांची पुस्तके अभ्यासली आहेत. जेरसोन दिकून, गजानन नाईक, ब्राँझ फर्नाडिस, प्राध्यापक बापट, फा. हल, फा. फ्रान्सिस कोरिया, राजीन डिसिल्वा, तेरेसा अल्बकॅरे, एल्विस बाप्टिस्ट, पिसुर्लेकर, सोपारा दीप यांनी लिहिलेली वसई किल्ल्यावरील पुस्तके मी संग्रहित करून ठेवली आहेत. त्याचबरोबर विणा गवाणकर यांचे ‘एक होता काव्र्हर’, संगीता धायगुडे लिखित ‘हुमान’, डॉक्टर सिसिलिया काव्र्हालो ‘ऑलिव्हला लगडली तुळशीची पाने’, फादर जॉन फरोज ‘सत्तेत की सत्यात’, अनंत कदम ‘बंदिस्त देशात’, दिलीप राजगोर ‘ब्राह्मी स्क्रिप्ट’, फादर बेंनी अंगुरीया ‘द मेकिंग ऑफ मुंबई’, सूरज पंडित ‘स्टोरीज इन स्टोन’ या लेखकांची पुस्तके मी वाचली असून सूरज पंडित हे आता पीएच.डी. मार्गदर्शक आहेत.
नोकरीनिमित्त वेगवेळ्या देशांत गेलो. फ्रँकफर्ट-जर्मनी, बँकॉक, लंडन, अमेरिका यांसारख्या देशांत फिरत असताना सुट्टीच्या दिवशी माझी आणि पुस्तकांची जवळीक वाढली. प्रवासातला वेळ मी पुस्तक वाचण्यात घालवतो. मला आणि माझी पत्नी अर्चनाला वाचण्याची आवड असल्यामुळे आम्ही घरीच एक स्वत:ची लायब्ररी बनवली आहे. त्यात ५०० हून जास्त पुस्तके आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात वाचण्याचा आनंद मिळावा, यासाठी लायब्ररीच्या बाजूला एक छोटेखानी बाग आहे. त्यामुळे मन प्रसन्न होते.