scorecardresearch

खारेगाव पादचारी पुलामुळे प्रवाशांची दमछाक

खारेगाव उड्डाणपूल पादचाऱ्यांसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. हा पूल चढणे आणि उतरण्याची मोठी कसरत पादचाऱ्यांना करावी लागत आहे.

पहिल्याच दिवशी पादचाऱ्यांचे फाटकावरून उड्डाण

ठाणे : खारेगाव उड्डाणपूल पादचाऱ्यांसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. हा पूल चढणे आणि उतरण्याची मोठी कसरत पादचाऱ्यांना करावी लागत आहे. शिवाय पूर्वीपेक्षा १० ते १५ मिनिटे अधिक वेळ लागतो, पुलाची बांधणी करताना पादचाऱ्यांच्या सोयीचा विचारच झाला नसल्याच्या तक्रारी पादचाऱ्यांनी केल्या. रविवारी सायंकाळी काही नागरिकांनी उडय़ा मारून थेट फाटक ओलांडण्याचा प्रयत्न केला. मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गिकेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान असलेला खारेगाव फाटकामध्ये फाटक ओलांडताना अनेक अपघात होत असत. पादचारी आणि वाहन चालकांमुळे रेल्वेची वाहतूकही विस्कळीत होत असे. त्यामुळे ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून खारेगाव फाटकावर उड्डाणपूल उभारण्यात आला. त्याचे लोकार्पण नुकतेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. उड्डाणपूल सुरू झाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळत आहे. मध्यरेल्वेचे वेळापत्रकही यामुळे काहीसे सुधारले आहे. 

पादचाऱ्यांना मात्र फाटक बंद होणे हे डोकेदुखीचे कारण ठरू लागले असून याठिकाणी उभारण्यात आलेला पादचारी पूल म्हणजे पूर्वीचा गोंधळ बरा होता अशा प्रतक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. फाटक ओलांडण्यासाठी नागरिकांसाठी उड्डाणपुलावर पदपथ उभारण्यात आले आहे. त्यामुळे उड्डाणपुलावर जाण्यासाठी महापालिकेने जिने आणि उतार तयार केला आहे. परंतु हे जिने झिकझ्ॉक पद्धतीने असल्याने पादचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उड्डाणपुलाची बांधणी नक्कीच चांगली आहे, मात्र हा उतार आणि जिने चढण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागत असल्याचे क्षमा भोईर या पादचारी महिलेने सांगितले. तर अशा पद्धतीने जिने करण्याऐवजी साध्या पद्धतीने जिने तयार केले असते तर नागरिकांचा वेळ वाचला असता असे रमेश यादव या पादचाऱ्याने सांगितले.

यासंदर्भात महापालिकेच्या अभियंता विभागातील एका अधिकाऱ्याने ठरविण्यात आलेल्या आरेखनाप्रमाणे पुलाचे उतार आणि जिने तयार करण्यात आले आहे, असे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. जिने उभारण्यासाठी जागा अत्यंत कमी होती. त्यामुळे उतार, जिने अशा पद्धतीने हे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच सलग जिने बांधले असते तर नागरिकांना जिने चढताना धाप लागली असती, असे त्यांनी सांगितले. 

पादचाऱ्यांकडून रूळ ओलांडण्याची भीती

रविवारी सायंकाळी काही नागरिकांनी थेट भिंतीवरून उडय़ा मारत फाटक ओलांडण्याचा प्रयत्न केला. या नागरिकांना हटकणे रेल्वे कर्मचाऱ्यांना कठीण झाले होते. आता या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दल आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी नेमण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांकडून रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना हटकले जात आहे. परंतु सुरक्षा तोकडी होताच नागरिक पुन्हा रेल्वे रूळ ओलांडण्यास सुरुवात करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Passengers pedestrian bridge suffocates commuters ysh

ताज्या बातम्या