ठाणे – ठाणे रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे आणि गर्दीचे स्थानक म्हणुन ओळखले जाते. या स्थानकातून दिवसाला पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकात तिकीट काढण्यासाठी खिडकीबाहेर लांबच लांब रांगेमध्ये उभे राहण्यापेक्षा आता डिजिटल तिकीट काढण्याला प्रवाशांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे. यामध्ये एटीव्हीएम यंत्रणा आणि मोबाईल ॲपद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीमधुन दिसुन येत आहे.
ठाणे शहरातून मुंबईत तसेच नवी मुंबईमध्ये कामानिमित्ताने जाणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ठाणे स्थानकातून लाखो प्रवासी प्रवास करतात. तसेच ठाणे शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग आहेत. त्यामुळे विविध शहरातून दररोज रेल्वे मार्गे नोकरदार ठाणे शहरात ये-जा करतात. तिकिट काढण्यासाठी पुर्वीपासून स्थानकाबाहेर खिडकीजवळ लांबच लांब रांगेत उभे रहावे लागत होते. रांगेत उभे राहणे आणि वेळ वाचावा यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने तिकिट काढण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन सुविधा आणल्या आहेत. रेल्वेच्या या डिजिटल वाटचालीला प्रवाशांनी देखिल पसंती दिली आहे. यामुळे पारंपरिक खिडकीवरील प्रवाशांच्या रांगा ओसरत असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी ‘यूटीएस ऑन मोबाइल’ हे विशेष मोबाईल ॲप सुरू केले. या ॲपमुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी स्थानकावर जाणाऱ्याची गरज भासत नाही. थेट आपल्या स्मार्टफोनवरुन तिकीट खरेदी करता येते. शिवाय, या ॲपमुळे कॅशलेस व्यवहार शक्य झाल्यामुळेही प्रवाशांचा कल या सुविधेकडे वळताना दिसत आहे. ‘यूटीएस’ ॲपचा वापर केल्यास तिकीट खरेदीसाठी लागणारा वेळ वाचतो आणि रांगेत उभे राहण्याचा त्रासही सोसावा लागत नाही. केवळ ‘यूटीएस’ मोबाईल ॲपच नाही, तर एटीव्हीएम (स्वयंचलित तिकिट यंत्र), जनसामान्य तिकिट सेवा केंद्र, स्थानक तिकिटिंग सेवक, यात्री सेवक यांसारखे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे तिकीट खरेदीसाठी अनेक पर्यायी मार्ग खुले झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रवाशांना या यंत्रणांमुळे वेगवान, सोपा आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अनुभव मिळत आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार ठाणे स्थानकात सुमारे ३२ लाखांहून अधिक प्रवासी मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक पास वापरतात. तर दर महिन्याला ११ लाख ५९ हजार २७७ अधिक प्रवासी एटीव्हीएम मशीनचा तिकिट खरेदीसाठी वापर करतात. तर मोबाईल ॲपचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या ७ लाख ११ हजार ७९० इतकी आहे. तर जेटीबीएसचा वापर चार लाखांहून अधिक प्रवासी करतात. यात खिडकीद्वारे तिकीट काढणाऱ्याची संख्या ७ लाख ७२ हजार इतकी आहे.
– मासिक पासला अधिक पसंती
दर महिन्याला ६४,०७१ मासिक पास काढतात. त्या माध्यमातून तब्बल ३२ लाख प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. त्रैमासिक तिकिटांमधूनही ९.८६ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.
– वार्षिक पासांकडे दुर्लक्ष
अर्धवार्षिक व वार्षिक हंगामी पासांचा वापर अत्यंत मर्यादित आहे. फक्त १८३ तिकिटांद्वारे ६६,००० प्रवासी प्रवास करत असल्याचे आढळून आले.
– अशी मोजतात प्रवासी संख्या
रेल्वेने स्पष्ट केले आहे की ही आकडेवारी प्रवासी व्यक्तींची नसून, त्यांच्या एकूण प्रवासांची आहे. म्हणजेच, एका मासिक पासधारकाने महिन्यात सरासरी ५० वेळा प्रवास केला, तर ६४ हजार प्रवाशांनी मिळून साधारणतः ३२ लाख प्रवास केल्याचे गणित बनते.