रेल्वेगाडय़ांमध्ये प्रवेश नसल्याने हाल; खासगी वाहतूक प्रवास नकोसा
भगवान मंडलिक, लोकसत्ता
डोंबिवली : डोंबिवली, कल्याण परिसरातून दुर्धर व्याधी असलेले अनेक रुग्ण नियमित मुंबईत टाटा, केईएम, नायर, जे. जे., पी. डी. हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी जात होते. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लोकल सेवा बंद झाली. त्यामुळे त्यांच्यावर खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून आधीच आजाराने त्रस्त असलेल्या या रुग्णांना शहरांतील वाहतूक कोंडीचा अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे.
डोंबिवली, कल्याणमधून कर्करोग, मनोरुग्ण, मेंदूचे विकार, लहान बाळांच्या गंभीर आजाराचे रुग्ण मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. तेथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीप्रमाणे हे रुग्ण उपचारासाठी, औषधे गोळ्या घेण्यासाठी जातात. करोनापूर्व काळात हे रुग्ण आपल्या कुटुंबीयातील सदस्याला सोबतीला घेऊन लोकलने पुढे टॅक्सीने रुग्णालयापर्यंतचा प्रवास करून उपचार घेऊन घरी परतत होते. मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला. टाळेबंदी सुरू झाली. लोकल सेवा बंद झाल्या. त्यानंतर या रुग्णांचे सर्वाधिक हाल झाले. रुग्ण मोबाइलवरून मुंबईतील डॉक्टरांशी संपर्क करून औषध, उपचाराचा सल्ला घेत होते. अनेक रुग्णांची औषधे सर्वच औषध दुकानांत मिळत नाहीत. ती संबंधित रुग्णालयांमधूनच मिळतात.
या रुग्णांमध्ये काही मनोरुग्ण आहेत. त्यांना अतिशय सांभाळून मुंबईपर्यंत न्यावे लागते. काही रुग्ण गर्दी, जमाव पाहिले की हिंसक होतात. मुंबईत रुग्णालयात नेताना त्यांना त्यांच्या आवश्यक गोळ्या दिल्या की ते रुग्ण शांत राहतात. सध्या अत्यावश्यक सेवा लोकलमध्ये प्रवेश नाही. खासगी उबर किंवा इतर वाहनांतून नेताना अशा व्याधीग्रस्त रुग्णांना खूप सांभाळावे लागते. रस्त्यांवरील खड्डय़ात वाहन आपटले की हे रुग्णा वेदनेने तळमळतात, असे या रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.
डोंबिवली, कल्याणमधून ठाणे, मुंबईकडे जाताना एक ते दीड तास कोंडीत अडकतो. अशा वेळी बा रुग्ण विभागात डॉक्टर भेटतील की नाही याची शाश्वती नसते. मुंबईतील रुग्णालयात दुपारी १२ वाजता क्रमांक लागणार असेल तर घरातून सात वाजता बाहेर पडावे लागते.
तेव्हा तेथे वेळेवर पोहोचता येते. त्यानंतर मुंबईतून डोंबिवली, कल्याणकडचा परतीचा प्रवास पुन्हा वाहतूक कोंडीने सुरू होत असल्याने संध्याकाळी पाच वाजता सुरू झालेला प्रवास रात्री नऊ ते १० वाजता संपतो, असे अनुभव या रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. काही रुग्णांना आठवडय़ातून दोन ते तीन वेळा न्यावे लागते. म्हणजे वाहन भाडय़ासाठी १० ते १२ हजार रूपये खर्च होतात. शासनाने रेल्वेशी विचारविनिमय करून दुर्धर व्याधीच्या रुग्णांना अत्यावश्यक लोकलमध्ये प्रवेश देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी रुग्ण नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू केल्या आहेत. रेल्वे फक्त सेवा देण्याचे काम करते. त्यामुळे दुर्धर व्याधीच्या रुग्णांना अत्यावश्यक सेवा लोकलमध्ये प्रवेश द्यावा असे शासनाने सुचविलेले नसल्याने त्यांना तसा प्रवेश देता येत नाही. यासंबंधी शासनाने निर्णय घेणे आवश्यक आहे.
– प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे