दिवसाला ७ हजारांहून अधिक बाधित
ठाणे : ठाणे जिल्ह्यात आठवडाभरात ५५ हजार ९०३ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २३ जणांचा मृत्यू झाला. दिवसाला सरासरी ७ हजारहून अधिक करोनाबाधित आढळून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील आहेत. रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता काहीशी वाढली आहे. ७ ते १३ जानेवारी या एका आठवडय़ाच्या कालावधीत तब्बल ५५ हजार ९०३ नवे करोना रुग्ण जिल्ह्यात नव्याने आढळून आले. म्हणजेच, सरासरी दिवसाला सात ते आठ हजार करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ३१ डिसेंबर २०२१ ते ६ जानेवारी या आठवडाभरात २१ हजार १८३ रुग्ण आणि आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मागील आठवडय़ाच्या तुलनेत या आठवडय़ातील करोना रुग्णसंख्या ही दुपटीने वाढल्याचे समोर आले आहे. रुग्णवाढीसोबतच मृत्यूची संख्याही वाढली आहे.
सर्वाधिक रुग्ण हे ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि मीरा भाईंदर क्षेत्रात आढळून येत आहेत. ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात या आठवडय़ाभरात दररोज प्रत्येकी दोन ते अडीच हजार करोना रुग्ण आढळून आले आहेत. मागील आठवडय़ात त्याचे प्रमाण प्रत्येकी एक हजार ते १२०० इतके होते. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज या आठवडय़ाभरात १,५०० ते १,६०० करोना रुग्ण आढळून येत आहेत. तर मीरा भाईंदर क्षेत्रात दररोज ८०० ते ९०० करोना रुग्ण आढळून येत आहेत. मागील आठवडय़ात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवसाला ४५० ते ५०० तर मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात २५० ते ३०० करोना रुग्ण आढळून येत होते. रुग्णवाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.