ठाणे : येथील येऊर गावातील एका शेतकऱ्याच्या दोन बैलांना काही जणांनी इंजेक्शन देऊन चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बैल चोरीचा प्रयत्न फसला असून यापैकी एकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकूण चार जणांना अटक केली आहे. ठाणे येथील येऊर गावातील पाटोणपाडा परिसरात विलास रघुनाथ बरफ (३६) हे कुटूंबासमवेत राहतात. या गावात त्यांची त्यांची वडिलोपार्जीत शेतजमिन आहे. ते आणि त्यांचे वडील असे दोघे शेती करतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातुन त्यांचा उदरनिर्वाह चालतो. तसेच त्यांकडे पाच बैल, चार गाई आहेत.

शेतीचे कामकाज करण्यासाठी ते बैलांचा वापर करतात. दररोज सकाळी आठ वाजता ते सर्व जनांवरांना चारा चारण्यासाठी येऊरच्या जंगलात सोडतात. सायंकाळी ७.३० वाजता ते सर्व जनांवरे चरून स्वतःहुन गोठयात परत येतात. परंतु २६ फेब्रुवारीला त्यांनी नेहमी प्रमाणे जनावरे चरण्यासाठी जंगलात सोडली असता, दोन बैल सायंकाळी गोठ्यात परत आले नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यांना बैल आढळले नाहीत. त्यानंतर ते घरी परतले. २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३० वाजता ते घरी झोपलेले असताना त्यांना त्यांचे शेजारी राहणारे रमेश वळवी यांचा फोन आला.त्यांनी त्यांना पाटोणा पाडा, बस थांब्याकडे जाणाऱ्या पुलाजवळ येण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी काय झाले अशी विचारणा केली असता, दोन्ही बैलांना काही लोकांनी इंजेक्शन देवुन बेशुद्ध करून चोरी करून घेवून जात होते. त्यापैकी एकाला ग्रामस्थानी पकडले असून उर्वरित लोक पळून गेल्याचे वळवी यांनी सांगितले. त्यानंतर ते त्याठिकाणी गेले आणि यानंतर वर्तकनगर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दिली. तसेच ग्रामस्थांनी पकडलेल्या एकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे. या वृत्तास वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजकुमार वाघचौरे यांनी दिला आहे.