ठाणे : भिवंडी शहरातील गोदामे, कारखाने यामुळे शहरातील अंतर्गत मार्गावर अवजड वाहनांची वाहतुक होत होती. या अवजड वाहतुकीमुळे अपघात होऊन अनेकांचे नाहक बळी गेल्याने अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून सुरु होती. त्यातच भिवंडीतील एका डाॅक्टरचा अवजड वाहनामुळे मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. नागरिकांनी या घटनेनंतर अवजड वाहनांना भिवंडी शहरात विरोध केल्याने ठाणे वाहतुक पोलिसांनी अपघात टाळण्यासाठी भिवंडी शहरात अवजड वाहनांना कायमस्वरुपी प्रवेश बंदी लागू केली आहे. नागरिकांच्या हरकती, सूचना विचारात घेऊन पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल असे वाहतुक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

भिवंडी शहरात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गोदामे, कारखाने आहेत. त्यामुळे उरण जेएनपीए, गुजरात, नाशिक येथून हजारो अवजड वाहने भिवंडीत वाहतुक करतात. भिवंडीत नागरिकरणही वाढले असून महापालिका क्षेत्राची लोकसंख्या १३ लाख इतकी झाली आहे. अवजड वाहन शहरातील अंतर्गत भागात शिरल्यास अपघात, वाहतुक कोंडी होते. तसेच अनेकांचा अपघातात मृत्यू देखील झाला आहे.

भिवंडीत अवजड वाहनांना प्रवेश बंदी व्हावी यासाठी येथील नागरिकांनी आंदोलन देखील केली होती. शनिवारी देखील एका डाॅक्टरचा अवजड वाहनाखाली आल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे अवजड वाहनांना बंदी घातली जावी अशी मागणी नागरिकांकडून सुरु होती. अखेर पोलिसांनी शहरात अवजड वाहनांना बंदी घातली आहे. त्यासंदर्भाची अधिसूचना ठाणे वाहतुक पोलिसांनी काढली आहे.

असे आहेत वाहतुक बदल

– भिवंडी शहरात गुजरात, वाडा येथून वाहतुक करणाऱ्या आणि नाशिक, मुंबई अंजुरफाटा येथे वाहतुक करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना वंजारपट्टी नाका उड्डाणपूलावरून भिवंडीत प्रवेश करण्यास बंदी असेल. ही वाहने वंजारपट्टी उड्डाणपूलावरून डावे वळण घेऊन चाविंद्रा मार्गे वडपे येथून मुंबई नाशिक महामार्गाने किंवा वसई, अंजुरफाटाकडे जाणारी वाहने चाविंद्रा येथून नाशिक मुंबई महामार्गाने मानकोली मार्गे वाहतुक करतील.

कल्याण तसेच मुंबई येथून वाडा, गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मुंबई नाशिक महामार्गाने वडपे, चाविंद्रा वंजारपट्टी पूल, वाडा, गुजरातच्या दिशेने वाहतुक करतील.

– अंजुरफाटा मार्गे वाडा, गुजरात किंवा नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना अंजुरफाटा येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मानकोली मार्गे मुंबई नाशिक महामार्गाने किंवा गुजरातच्या दिशेने वाहतुक करणारी वाहने वडपे, चाविंद्रा-वंजारपट्टी मार्गे वाहतुक करतील.

– तळवली नाका येथून भिवंडी शहरात वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना भिवंडी शहरात प्रवेश करण्यास बंदी असेल. येथील वाहने तळवली नाका येथून खोणीगाव, पारोळ फाटा, वंजारपट्टी उड्डाणपूलावरून चाविंद्रा मार्गे मुंबई- नाशिक महामार्गाने वाहतुक करतील.