ठाणे: फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या व्यक्तीचा गुरुवारी रात्री अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सतिश जाधव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते वाघबीळ भागात मुलगा, पत्नी यांच्यासोबत राहत होते. जेवल्यानंतर त्यांना रात्री वाघबीळ येथील रेतीबंदर खाडी परिसरात फेरफटका मारण्याची सवय आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ते जेवल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी गेले होते.
फेरफटका मारत असताना त्यांना एका भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांच्या शरिरावरून आणि डोक्यावरून वाहनाचे चाक गेले. घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ तेथे धाव घेतली.
अपघातानंतर वाहनातील चालक पळून गेला होता. सतिश यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाता प्रकरणी सतिश यांच्या मुलाने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.